Nanded Crime : नांदेडमध्ये गुन्हेगारीचा वाढता कहर; कायद्याच्या राज्यासाठी ठोस उपायांची गरज

crime 3 Nanded Crime : नांदेडमध्ये गुन्हेगारीचा वाढता कहर; कायद्याच्या राज्यासाठी ठोस उपायांची गरज

नांदेड,गोविंद मुंडकर| शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा हत्या, गोळीबार, तसेच टोळ्यांमधील रक्तरंजित संघर्ष या घटनांमुळे नांदेडची ओळख “गुन्हेगारांचे शहर” अशी बनत असल्याची चिंताजनक परिस्थिती आहे.

अलीकडेच भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डी-मार्ट परिसरात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास दोन टोळ्यांमध्ये जुना वाद उफाळून आला. या वादातून तलवारी व खंजीरांनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला. या भीषण संघर्षात तीन जणांचा मृत्यू झाला असून एका जखमी व्यक्तीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचाही खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली.

या प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाणे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही टोळ्यांतील अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

प्राथमिक आणि प्राप्त माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अजितसिंग आणि मोहम्मद अरबाज यांच्यात वाद झाला होता. त्याच वादातून हा हल्ला झाला. अजितसिंगवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याच्या साथीदारांनी प्रत्युत्तरादाखल सैय्यद अवेज याचा खून केला, तर मोहम्मद अरबाज गंभीर जखमी झाला. पुढे उपचारासाठी रुग्णालयात दाखल असताना त्याच्यावर पुन्हा हल्ला करून त्याचा खून करण्यात आला.

यापूर्वीही संजय बियाणी यांची दिवसा हत्या, विद्यार्थ्यांवर हल्ले, तसेच शहरात झालेल्या गोळीबाराच्या घटना यामुळे नांदेडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात गुन्हेगारी टोळ्यांचा वाढता प्रभाव आणि त्यातून होणारे हिंसक प्रकार नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत.

या पार्श्वभूमीवर केवळ कडक कायदे लागू करणे पुरेसे नसून, दीर्घकालीन आणि दूरगामी परिणाम करणारे उपाय राबविण्याची आवश्यकता आहे. युवकांना गुन्हेगारीपासून दूर ठेवण्यासाठी शिक्षण, रोजगार आणि सामाजिक जनजागृती कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. तसेच पोलिसांनी गुप्त माहिती संकलन, तांत्रिक तपास आणि नियमित गस्त यावर अधिक भर देण्याची गरज आहे.

नांदेड शहरात कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन ठोस पावले उचलली तरच या वाढत्या गुन्हेगारीला आळा बसू शकतो. सामाजिक संघटना, शासन, प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांचे संयुक्त उपक्रम राबवण्याचे गरज निर्माण झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top