नांदेड, प्रतिनिधी| नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत शनिवारी, दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, सकाळी ७.४६ वाजता ३.३ रिश्टर स्केल आणि त्यानंतर ९.४३ वाजता ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप नोंदविण्यात आला.


या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावाजवळ असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. धक्क्यांची तीव्रता तुलनेने कमी असली तरी नांदेड जिल्ह्यातील काही भागात त्याची जाणीव झाली.


दरम्यान, नांदेड जिल्ह्यात भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून संबंधित सर्व यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आले आहे.



प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
भूकंपाचे धक्के जाणवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता त्वरित सुरक्षित ठिकाणी किंवा मोकळ्या जागेत जावे, इमारती, विद्युत खांब आणि इतर धोकादायक ठिकाणांपासून अंतर ठेवावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

पालकमंत्री अतुल सावेंकडून आढावा
भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. नांदेड जिल्ह्यात सध्या कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नसल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये आणि केवळ अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची यंत्रणा सज्ज असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

