हदगांव, गौतम वाठोरे| शहरातील तामसा रोडवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते नवी आबादीपर्यंत असलेल्या पाच विद्युत रोहित्रांपैकी तहसील कार्यालयासमोरचे रोहित्र पूर्णपणे उघडे पडले असून परिसरात मोठ्या प्रमाणात ये-जा करणाऱ्या नागरिक व वाहनचालकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. नव्या आबादी स्मशानभूमीजवळील रोहित्राचीही अवस्था अशीच असून रमाई चौक, जयभीमनगर, बुद्धभूमी वसाहत, मुलींचे वसतिगृह रोड या भागात अनेक ठिकाणी खराब व उघडी रोहित्रे दिसत आहेत.


मुख्य रस्त्यालगत उघडी रोहित्रे असल्याने पादचारी, प्रवासी, विद्यार्थी यांच्यात भीतीचे वातावरण आहे. कला वाणिज्य महाविद्यालय तसेच समाजकल्याण शासकीय मुलींच्या वसतिगृहाजवळील रोहित्रामुळे विद्यार्थी विशेषतः चिंतीत आहेत. काही ठिकाणी ठिणग्या उडताना दिसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.


तामसा रोड परिसरात सकाळ-संध्याकाळ मोठी वर्दळ व मोकाट जनावरे फिरत असल्याने गंभीर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. “मुलांना शाळेत नेताना भीती वाटते. ही उघडी रोहित्रे कधीही जीवघेणा अपघात घडवू शकतात,” असे एका स्थानिक नागरिकाने सांगितले.


नागरिकांनी याबाबत वारंवार विद्युत विभागाकडे तक्रारी केल्या असूनही अद्याप दुरुस्तीची कोणतीही कामे सुरू झालेली नाहीत. तातडीने उघडी व जीर्ण रोहित्रे दुरुस्त करून सुरक्षित करण्यात यावीत, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.


