उस्माननगर, माणिक भिसे l महिलांचे केवळ आर्थिक सक्षमीकरण पुरेसे नाही, तर त्यासोबत मानसिक आणि सामाजिक सक्षमीकरणही तितकेच महत्त्वाचे आहे. महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली नाही, तर त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे महिलांनी योग्य व पौष्टिक आहार घेणे, नियमित वैद्यकीय तपासणी करणे आणि मानसिक आरोग्यावर लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत संस्कृती संवर्धन मंडळाच्या अधीक्षक गीता गायकवाड यांनी व्यक्त केले.


राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक –नाबार्ड व संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेच्या माध्यमातून दि . ६ मार्च २०२५ रोजी लाठ खु. ता. कंधार येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या महिला दिनाची संकल्पना “यशस्वीतेसाठी कामाला गती द्या” अशी आहे या अनुषंगाने हा महिलांच्या प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

महिला आरोग्य आणि मासिक पाळी स्वच्छतेवर विशेष भर महिलांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करताना डॉ. माधुरी रेवनवार वरिष्ठ वैज्ञानिक, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांनी मासिक पाळीतील स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. महिलांमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत असून, मासिक पाळीदरम्यान स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांनी पुढे सांगितले की, बाजारात सहज उपलब्ध असलेल्या सॅनिटरी पॅडचा योग्य वापर करणे, जुने कापड टाळणे आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

आर्थिक सक्षमीकरण आणि उद्योजकतेच्या संधी
नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक दिलीप दमय्यावार यांनी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनावर आणि उद्योजकतेच्या संधींवर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, महिलांनी स्वतःच्या बँक खात्याचे व्यवस्थापन स्वतः करावे व मिळालेल्या निधीचा योग्य वापर करावा.

तसेच, लाडकी बहिण, लखपती दीदी यांसारख्या शासकीय योजनांचा लाभ घेऊन महिलांनी स्वतःच्या व्यवसायासाठी आर्थिक स्थैर्य निर्माण करावे. कर्ज घेताना त्याच्या परतफेडी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे, अन्यथा आर्थिक अडचणी उद्भवू शकतात. जागतिक महिला दिनानिमित्य गावातील महिला समुदाय संसाधन कार्यकर्ती वर्षा संजय जाधव व अंगणवाडी सेविका कल्पना मोरे यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्ती जोगपेटे, तर आभार प्रदर्शन गंगामनी अंबे यांनी केले. यावेळी प्रकल्प व्यवस्थापक गंगाधर कानगुलवार, सुलोचना रावजी इंगोले, संध्या बाबळे, कल्पना बाबळे, बळीराजा पाणलोट विकास समितीचे शंकर गिरी, बळीराम इंगोले, विनायक इंगोले, शिवाजी इंगोले, गणेश घोरबांड, तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्षा संजय जाधव ,चंद्रकांत बाबळे व विजय भिसे यांनी विशेष परिश्रम घेतले.