नांदेड| नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये २०१९ च्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम करून युती धर्माचे पालन करून शिवसेनेची जागा निवडून आणली होती. वास्तविक पाहता शिवसेनेचे कोणतेही संघटनात्मक काम या मतदारसंघांमध्ये नव्हते परंतु भाजपाच्या नेत्यांनी ही निवडणूक आपल्या हातात घेऊन नगरसेवक असणार्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला आमदार बनविले. येणार्या २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युतीधर्माचे पालन करत असताना भाजपाच्या कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान जपणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे.
त्यामुळे भाजपाचे नेतृत्व कोणत्याही परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान जपण्याची पराकाष्ठा करणार आहे असे मत छत्तीसगड येथील भाजपाचे प्रवासी नेते आशु चंद्रवंशी यांनी नांदेड येथे व्यक्त केले. नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाच्या भाजपा कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे नांदेड चे माजी महानगराध्यक्ष प्रवीणभाऊ साले, नांदेड उत्तर विधानसभा अध्यक्ष मिलिंद देशमुख, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा श्रद्धाताई चव्हाण, प्रतापराव पावडे, साहेबराव गायकवाड, अमोल कदम, व्यंकटेश मोकले, बंडू पावडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. आपल्या आवेशपूर्ण व कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करताना त्यांनी भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेंचा आधार घेतला. त्यामुळे या बैठकीमध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण झाले.
यावेळी कार्यकर्त्यांना बोलताना त्यांनी सांगितले,लोकसभेच्या निवडणुकीनंतर ग्राउंड लेव्हलवर काम करणार्या कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढलेली असून पराभवाच्या मानसिकते मधून कार्यकर्त्यांनी बाहेर पडले पाहिजे. सामान्य कार्यकर्ता हा भाजपाचा केंद्रबिंदू असून त्याच्या बळावरच निवडणुका जिंकल्या जातात. त्यामुळे येणार्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी व शक्ती केंद्र प्रमुखांनी, बूथप्रमुखांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली तर निश्चितच महाराष्ट्रातील चित्र बदलण्याची शक्यता आहे. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवार द्यायचा की नाही याची चाचपणी करण्यासाठी मी आलेलो असून सामान्य कार्यकर्त्यांची मते मी जाणून घेत आहे. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये सामान्य कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान व आमदारांना निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा असणार्या कार्यकर्त्यांचा सन्मान, स्वाभिमान जपणे सुद्धा महत्त्वाचे आहे. या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद व संघटन मोठ्या प्रमाणावर आहे. याचा फायदा हा मतदारसंघ आपल्या ताब्यात आणण्यासाठी होऊ शकतो का याची चाचचणी करून अहवाल पक्षश्रेष्ठीकडे देण्याचे काम मी प्रामाणिकपणे करणार असल्याचे भाजपाचे प्रवासी नेते आशु चंद्रवंशी यांनी सांगीतले.
यावेळी महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकित साहेबराव गायकवाड, श्रद्धा जाधव, प्रतापराव पावडे, आनंद पावडे, सुनील राणे, आशिष नेरलकर, मारुती वाघ यांनी बुथ वरील कार्यकर्त्या पर्यंत मान आत्म सन्मान भेटत नसल्याची खंत आपल्या मनोगतातून भावना व्यक्त करून कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम या मतदारसंघासाठी दिलेले छत्तीसगड येथील प्रवासी नेते आशु चंद्रवंशी यांनी करावे अशी मागणी केली. हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला सोडण्यात यावा. पक्षाने ठरविलेल्या संघटनात्मक बैठकीचे सूत्रसंचालन व आभार अमोल कदम यांनी मानले. बैठकीला नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, विविध आघाड्यांचे कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या व नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तर विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे येणार असल्याचे सुतोवाच
मागील तीन-चार महिन्यापासून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाला भाजपाने सोडून दिला आहे का अशी स्थिती निर्माण झाली होती. या मतदारसंघासाठी विस्तारक, विधानसभा प्रभारी किंवा प्रवासी कार्यकर्ता मागील तीन-चार महिन्यात न फिरकल्यामुळे हा मतदारसंघ शिंदे गटाला सुटला अशी संभ्रमाची अवस्था भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती. परंतु भाजपाच्या राज्यस्तरीय नेतृत्वाने छत्तीसगड येथील प्रवासी नेते पाठवून राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन प्रत्येक कार्यकर्त्याचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे येणार असल्याचे सुतोवाच या बैठकीच्या माध्यमातून मिळाल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्ष जो ठरवेल त्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याची मनोभूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांचा उत्साह या बैठकीत दिसून आला. या मतदारसंघात शिवसेनेकडून आत्म सन्मानाची वागणूक भाजपाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना मिळत नसल्याची खंत कार्यकर्त्यांनी बोलून दाखवतात प्रवासी नेते आशु चंद्रवंशी यांनी त्याची तात्काळ दखल घेऊन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व वरिष्ठ नेतृत्वाकडे या सर्व बाबी मी स्वतः कळवेल असे सांगताच याचे स्वागत कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून केले.