हिमायतनगर। येथील सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना जॉब कार्डसह त्यांच्या विविध मागण्यासाठी नगरपंचायत प्रशासन सपशेल अपयशी ठरली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कारभार कायम प्रभारीवर चालत असल्याने नगरपंचायत प्रशासकीय यंत्रणा कामे करण्यात अयशस्वी ठरत आहे. असे असताना सत्ताधारी नेते केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन कामे करत आहेत. याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याने दोन दिवसापासून महिलांना आंदोलन करावे लागते ही लाजिरवाणी बाब आहे. आतातरी प्रशासकीय यंत्रणेने महिलांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना जॉब कार्ड वाटप करून त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या. अन्यथा 30 तारखेला महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा डॉ. रेखाताई चव्हाण गोरलेगावकर यांनी दिला

हिमायतनगर शहरातील नगरपंचायत कार्यालयासमोर दिनांक 24 सप्टेंबर पासून लोकविकास समन्वयक संघर्ष समिती व सिटू कामगार संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला हदगाव हिमायतनगर विधानसभेच्या नेत्या तथा महाराष्ट्र महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्ष व प्रभारी नांदेड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सौ रेखाताई चव्हाण गोरलेगावकर यांनी भेट दिली यावेळी त्या बोलत होत्या. शेकडो महिलांनी हिमायतनगर नगरपंचायत प्रशासनाकडे जॉब कार्डसह विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाला आज तीन दिवस होऊन सुद्धा येथील प्रशासनाने त्याची कुठलीही दखल घेतली नाही.बएव्हढेच नाहीतर नगरपंचायत अखत्यारीत शहरातील सर्वच नागरिकांना विविध नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

मागील 15 दिवसापूर्वी शहरातील विविध वॉर्डाचा दौरा केल्यानंतर शहराचा विकास कसा झाला हे मी पाहिलं असून, केवळ राजकिय नेत्यांनी घरे भरण्याची काम करून नागरिकांना समस्यांच्या विळख्यात टाकले आहे. दररोज अनेकजण फोन करून शहरातील रस्ते, नाल्या, पिण्याचे पाणी, वीज, यासह अस्वच्छतेच्या तक्रारी करतात. यासह आता महिलांना विविध मागण्यांसाठी आंदोलन करावे लागते ही खेदाची बाब आहे. हिमायतनगर शहरातील महिलांसह ईतर नागरी सुविधांचा लेखाजोखा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे मांडून पाठपुरावा करणार आहे.

त्यापूर्वी नगरपंचायत प्रशासकीय यंत्रणेने बेमुदत आंदोलनाची दखल घेऊन शहरातील महिलांच्या प्रश्न तात्काळ मार्गी लावावे अन्यथा दोन दिवसात नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात महाविकास आघाडी मधील सर्व घटक पक्षांना घेऊन प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा देत सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. यावेळी शेकडो आंदोलन कर्त्या महिला पुरुष उपस्थित होते.
