नांदेड l सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरास सुरळीत पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीकोणातुन आज दि.२८.०८.२०२५ रोजी *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे* यांनी पाणी पुरवठा विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरातील पाणी पुरवठा प्रथम प्राधाण्याने सुरळीत करण्याच्या सुचना यावेळी आयुक्तांनी दिल्या आहेत.


त्यामध्ये काबरा नगर, डंकीन, सिडको व असदवन येथील जलशुध्दीकरण केंद्रावरुन होणाऱ्या पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार सद्यस्थितीमध्ये झोन क्र.१ तरोडा-सांगवी, झोन क्र.४ वजिराबाद व झोन क्र.६ सिडको-हडको-कौठा या भागामध्ये दोन दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच झोन क्र.२ अशोक नगर, झोन क्र.३ शिवाजी नगर व झोन क्र.५ इतवारा-देगलुर नाका या भागातील जलकुंभावरुन तीन दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.

त्याअनुषंगाने डंकीन जलशुध्दीकरण केंद्र संपुर्ण क्षमतेने चालवुन इतर जलशुध्दीकरण केंद्रावरील ताण कमी करणे आवश्यक असुन त्याचप्रमाणे काबरा नगर जलशुध्दीकरण केंद्रावरील ताण कमी करण्यासाठी कोटीतीर्थ पंपगृह ते डंकीन जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत करण्यात येणारी ७५० मी.मी. व्यासाची ६.३ कि.मी. लांबीची मुख्य जलवाहीणीचे काम तातडीने पुर्ण करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले आहेत. तसेच *ज्या भागामध्ये तीन दिवस आड पाणी पुरवठा होत आहे त्या भागात आता दिनांक ०१.०९.२०२५ पासुन दोन दिवस आड पाणी पुरवठा करण्यासाठी आयुक्तांनी आदेशीत केले आहे.


तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्व जलशुध्दीकरण केंद्र व पंपगृह येथील विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत होत असतांना सुध्दा शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची आयुक्तांना सांगितले.

सदरील बैठकीस महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्यासह शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, उपअभियंता प्रकाश कांबळे, नरेंद्र सुजलेगांवकर, कनिष्ठ अभियंता सरपाते, जक्कीउल्ला खाँन, स्वामी, शेख जैनोद्दीन यांची उपस्थिती होती.

