नांदेड| राज्य शासनाने नोकर भरती मोठ्याप्रमाणात सुरू केली असून याअंतर्गत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 ही येत्या 1 डिसेंबरला होणार आहे. नांदेडमधील सर्व प्रमुख शाळा व महाविद्यालयांमध्ये या परीक्षेचे केंद्र असून परीक्षेसंदर्भात असणारी नाकाबंदी व शंभर मिटर पर्यंत प्रवेश बंदी केली जाणार आहे. नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या महत्त्वपूर्ण परीक्षेला लक्षात घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते 5 याकालावधीमध्ये दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे. त्यामुळे रविवारी सेंटर असलेल्या शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात कोलाहल असणार नाही. कुठेही डिजे वाजणार नाही. किंवा शंभर मिटर पर्यंत मोबाईलपासून सर्व प्रकारच्या साहित्याला परिक्षा केंद्राच्या परिसरात वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम 163 अन्वये सर्व निर्बंध लादण्यात आले असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
2 डिसेंबरला लोकशाही दिन
नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने सोमवार 2 डिसेंबरला नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी लोकशाही दिनामध्ये आपल्या तक्रारीसह उपस्थित व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. निवेदन नोंदणीची सुरूवात दुपारी 12 वा. होणार आहे. त्यानंतर लगेच प्राप्त झालेल्या अर्जावर सुनावणी घेण्यात येणार आहे. नागरिकांनी दुपारी 1 ते 3 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.
4 डिसेंबरपासून होणाऱ्या जंतनाशक अभियानात सहभागी व्हा; जंतनाशक गोळी घेण्यासाठी घाबरू नका
राज्यात 4 डिसेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविण्यात येत असून याअंतर्गत 1 ते 19 वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी दिली जाणार आहे. ही गोळी चावून खाणे गरजेचे आहे किंवा पाण्यात घेता येईल. या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी केले आहे.
जिल्ह्यातील अर्धापूर, धर्माबाद, लोहा, मुदखेड, नांदेड व उमरी या तालुक्यांमध्ये ही मोहिम राबविली जाणार आहे. सर्व शाळांमधून अल्बेडॅझोलची गोळी देण्यात येणार असून लहान मुलांना पाण्यातून तर 6 ते 19 वयोगटातील मुलांना चावून खाण्यासाठी सांगण्यात येणार आहे. 4 डिसेंबरला जे वंचित राहिले त्यांना 10 डिसेंबरला ही गोळी दिली जाणार आहे. चांगल्या आरोग्यासाठी ही गोळी अतिशय आवश्यक असून शिक्षक, पालक यांनी या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.