नांदेड, प्रतिनिधी| भोकर येथे शासकीय परिचर्या (नर्सिंग) महाविद्यालय सुरू करण्यास मंजुरी द्यावी, अशी जोरदार मागणी माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण आणि भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मुंबई येथे झालेल्या भेटीत नांदेड जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, रेल्वे आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.



आ. श्रीजया चव्हाण यांनी सांगितले की, भोकर व परिसरातील विद्यार्थ्यांना आरोग्य शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात आणि स्थानिक युवक-युवतींना रोजगाराची नवी दालने खुली व्हावीत, यासाठी गेल्या वर्षभरापासून भोकर उपजिल्हा रुग्णालयात शासकीय नर्सिंग कॉलेज सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या मागणीला तातडीने मंजुरी द्यावी, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.



नांदेड-लातूर रेल्वे मार्गाला गती देण्याची मागणी – यावेळी खा. अशोकराव चव्हाण यांनी नांदेड-लातूर नवीन रेल्वे मार्गाच्या अंतिम मंजुरी प्रक्रियेला गती देण्याची मागणी केली. हा रेल्वे प्रकल्प मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगत त्यांनी या प्रकल्पासाठी राज्य सरकारने केलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभारही मानले.



नांदेड येथे उभारण्यात येणाऱ्या 500 खाटांच्या श्रेणीवर्धित जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवीन इमारतीस प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यापूर्वी या प्रकल्पासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याची मागणी आ. श्रीजया चव्हाण यांनी केली.
भोकर मतदारसंघातील विकासकामांकडेही वेधले लक्ष
या भेटीत भोकर येथे पोलीस विभागाच्या प्रस्तावित कार्यालयीन व निवासी इमारतींसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा उपलब्ध करून देणे, मौजे नारवट येथील वन्यप्राणी उपचार केंद्रासाठी आवश्यक मनुष्यबळ मंजूर करणे, तसेच भोकर, अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यातील विविध विकासकामांबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यात आले.
दरम्यान, भोकर तालुक्यातील महत्त्वाकांक्षी पिंपळढव साठवण तलाव प्रकल्पासाठी नाबार्डकडून 85.41 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर केल्याबद्दल आ. श्रीजया चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.

