तरुणांनी उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढे आल्यास सर्व यंत्रणांनी आवश्यक सहकार्य करावे
नांदेड | जिल्ह्याचा विकासदर वाढविण्यासाठी उद्योग, विविध प्रकल्प आणि रोजगारनिर्मितीच्या संधी वाढविणे आवश्यक आहे. तरुणांनी उद्योग, व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्यास सर्व शासकीय यंत्रणांनी त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रत्येक विभागाने आपल्या कामाकडे जिल्ह्याच्या सकल देशांतर्गत उत्पादनातील (GDDP) योगदान म्हणून पाहून सक्रियता व संवेदनशीलतेने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.


जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली महास्ट्राईड प्रकल्पाबाबत जिल्हास्तरीय विभागप्रमुखांची परिचयात्मक व समन्वय बैठक तसेच ‘विकसित महाराष्ट्र-2047’ आणि नांदेड जिल्ह्यातील सीएसआरबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झाली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर चिंचाणे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित कामांना सर्व विभागांनी प्राधान्य द्यावे. उपलब्ध संसाधने, मनुष्यबळ आणि निधीचा प्रभावी वापर करून विकासकामांना गती द्यावी, अशा सूचनाही कर्डिले यांनी दिल्या.



दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सीएसआरमधून कामे हाती घ्या
सध्याची दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांसमोर विविध प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता यासह आवश्यक बाबींसाठी सामाजिक उत्तरदायित्व निधी (CSR)च्या माध्यमातून उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले.



बँका, कंत्राटदार, पेट्रोलपंपधारक तसेच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सहकार्य करू शकणाऱ्या संस्था व घटकांच्या सहभागातून नाला खोलीकरण, रिचार्ज शाफ्ट, पाणी पुनर्भरण, शाळांमधील स्वच्छतागृहे, अंगणवाडी व शाळांच्या पायाभूत सुविधा तसेच आयटीआयमध्ये आवश्यक प्रयोगशाळा उभारण्यासारखी कामे सीएसआरमधून हाती घेता येतील. त्यासाठी संबंधित विभागांनी प्रस्ताव व मागणी तयार ठेवावी, असे निर्देश त्यांनी दिले.

दुष्काळी परिस्थितीत प्रभावी नियोजनावर भर
जलसंधारण, जलसंपदा, कृषी विभागासह संबंधित सर्व यंत्रणांनी आवश्यक कामांचे प्रस्ताव तयार ठेवावेत. शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास, पशुसंवर्धन तसेच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणांनी आपल्या कार्यक्षेत्रातील आवश्यक बाबींवर विशेष लक्ष द्यावे. उपलब्ध निधी व योजनांचा योग्य वापर करून दुष्काळी परिस्थितीत प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असेही कर्डिले यांनी स्पष्ट केले.
जिल्हा वार्षिक योजनेतील कामांचे योग्य नियोजन करून गरजेनुसार प्राधान्यक्रम निश्चित करावा. दुष्काळाशी संबंधित कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पूर्वपरवानगीशिवाय रजा घेऊ नये, अशी सूचना त्यांनी केली. तसेच महास्ट्राईड प्रकल्पासाठी संबंधित विभागांनी आवश्यक माहिती व डाटा वेळेत भरावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

