नांदेड| नांदेड शहरासह गोदावरी नदीकाठावरील गावांना भविष्यात पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा आणि डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी जलाशयातील पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी सुरक्षित राहावा, यासाठी प्रशासनाने अनधिकृत पाणी उपशाविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार आणि तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


दुष्काळसदृश परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पाण्याचा अनधिकृत वापर आणि अपव्यय रोखण्यासाठी महसूल, पोलीस व संबंधित विभागांच्या संयुक्त पथकांनी विविध ठिकाणी कारवाई केली. या मोहिमेदरम्यान रहाटी, जैतापूर, सोमेश्वर, पिंपळगाव को., बोरगाव ते., थुगाव, मार्कड, पिंपळगाव निमजी, कल्लाळ, विष्णुपुरी आणि कोटीतीर्थ येथील एकूण ५१ डेपोचे वीज कनेक्शन खंडित करण्यात आले.


याशिवाय विविध ठिकाणी जलाशयातून पाणी उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या २१५ अनधिकृत मोटारींचे कनेक्शन तोडण्यात आले. त्यामुळे जलाशयातील अनधिकृत पाणी उपसा रोखण्यास मदत होणार असून उपलब्ध पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी सुरक्षित ठेवण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे.




ही कारवाई महसूल आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत करण्यात आली. ए. बी. सिंगणवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी श्रीकृष्ण येलमटे, एएसआय रामराव ढोले, मंडळ अधिकारी सय्यद मोहसिन, पोलीस उपनिरीक्षक रामराव केंद्रे तसेच एम. एफ. बागवान यांच्या पथकाने कारवाई केली. तसेच मंडळ अधिकारी मधुकर फुलवले, पोलीस उपनिरीक्षक गोविंद जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही या मोहिमेत सहभाग घेतला.
नांदेड शहर तसेच गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने व योग्य पद्धतीने वापर व्हावा, यासाठी अनधिकृत पाणी उपशाविरोधातील कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

