Homeकृषीशेतकऱ्यांना पैसे परत करण्याचा शब्द हवेतच विरला?

शेतकऱ्यांना पैसे परत करण्याचा शब्द हवेतच विरला?

काल उपोषणस्थळी आश्वासन; आज कर्मचारी रजेवर असल्याचे सांगून टोलवाटोलवी पैसे परत न केल्यास पुन्हा उपोषणाचा इशारा

हिमायतनगर, अनिल मादसवार| घरकुलासाठी घेतलेले २० ते २५ हजार रुपये आणि विहिरीच्या कामासाठी घेतलेले ४० ते ५० हजार रुपये शेतकऱ्यांना परत करण्याचा शब्द हिमायतनगर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून उपोषणस्थळी देण्यात आला होता. मात्र, आज संबंधित शेतकऱ्यांना घेऊन पैसे परत मिळविण्यासाठी कार्यालयात गेले असता, “पैसे घेणारा कर्मचारी रजेवर आहे” असे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

हिमायतनगर तालुक्यातील लाभार्थ्यांना पंचायत समितीअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच विहिरीच्या कामासाठी पैसे घेतल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी पैसे परत करण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने तहसीलदारांमार्फत वामनराव पाटील वडगावकर आणि श्रीदत्त पाटील सोनारीकर यांच्या पाच दिवसांच्या उपोषणादरम्यान देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

उपोषणस्थळी दिलेल्या आश्वासनानंतर संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी संबंधित कर्मचारी रजेवर असल्याचे कारण पुढे आल्याने आश्वासनाची अंमलबजावणी नेमकी कधी होणार? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

आश्वासन नव्हे, आता कृती हवी!

शेतकऱ्यांनी कष्टाने कमावलेला पैसा कथितरीत्या घेण्यात आला असेल, तर तो तातडीने परत मिळणे आवश्यक आहे. “पैसे घेणारा कर्मचारी रजेवर आहे” या कारणामुळे शेतकऱ्यांना पुन्हा कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत असतील, तर प्रशासनाने याची गंभीर दखल घेण्याची गरज असल्याची भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली.

उपोषणस्थळी दिलेला शब्द पाळून संबंधित शेतकऱ्यांचे पैसे तातडीने परत करावेत. तसेच पैसे घेण्याच्या कथित प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि उपोषणकर्त्यांच्या उपस्थितीत गटविकास अधिकारी नारवटकर यांच्याकडेही हा प्रश्न मांडण्यात आला. संबंधित शेतकऱ्यांना पैसे परत मिळाले नाहीत तर पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. त्यामुळे आता प्रशासन या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी करते, याकडे शेतकरी व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

“साहेब, आश्वासन पुरे झाले; आता शेतकऱ्यांचे पैसे परत करा आणि दोषींवर कारवाई करा,” अशी मागणी पंचायत समिती कार्यालयात उपस्थित झालेले शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात आली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments