हिमायतनगर, अनिल मादसवार| दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी कुटुंबांसमोर आर्थिक संकटासोबतच आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवेचा आधार मिळावा, या सामाजिक भावनेतून आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या वतीने हिमायतनगर येथे रविवारी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित या शिबिराला हिमायतनगर शहरासह परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.


दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविताना आरोग्यावरील खर्च करणे अनेकांसाठी कठीण झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन आमदार कोहळीकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरात विविध आजारांची तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन तसेच आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना एकाच ठिकाणी विविध आरोग्य सुविधांचा लाभ घेता आला.


हजारो नागरिकांनी घेतला आरोग्यसेवेचा लाभ – रविवारी सकाळपासूनच शिबिराच्या ठिकाणी शेतकरी व नागरिकांची गर्दी होऊ लागली. दुपारी दोन वाजेपर्यंत पाच ते सात हजारांहून अधिक रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला, अशी माहिती देण्यात आली. शिबिराला मिळालेला प्रतिसाद पाहता सायंकाळपर्यंत रुग्णांची संख्या १० हजारांहून अधिक होईल, असा विश्वास आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी व्यक्त केला.

दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना महागड्या उपचारांचा आर्थिक भार सहन करावा लागू नये आणि आर्थिक अडचणीमुळे कोणीही आरोग्यसेवेपासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आमदार कोहळीकर यांनी सांगितले. दरम्यान, दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी आरोग्य शिबिरापुरताच उपक्रम मर्यादित न ठेवता आणखी एक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्याची घोषणा आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केली.




दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील शंभरहून अधिक जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दुष्काळामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झालेल्या कुटुंबांना विवाहाचा खर्च पेलणे कठीण होत आहे. त्यामुळे अशा कुटुंबांना आधार देत त्यांच्या मुला-मुलींचे विवाह सन्मानाने पार पडावेत, यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी – दुष्काळाच्या संकटात शेतकरी कुटुंबांना केवळ आर्थिक मदतीचीच नव्हे, तर आरोग्य, सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवरही आधाराची गरज आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराला मिळालेला हजारोंचा प्रतिसाद हा ग्रामीण भागातील आरोग्यसेवेची गरज अधोरेखित करणारा ठरला.

“दुष्काळाच्या संकटात शेतकरी कुटुंबांना एकटे सोडणार नाही; त्यांच्या अडचणीच्या काळात शक्य ती मदत करण्यासाठी आपण पुढे राहू,” या भूमिकेतून आरोग्य शिबिर आणि सामूहिक विवाहाचा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी स्पष्ट केले.
शेतकरी कुटुंबांच्या आरोग्याला दिलासा देणाऱ्या या उपक्रमामुळे हिमायतनगरसह परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आधार मिळाला असून, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

