नांदेड| हमीभाव देणाऱ्या बाजार समित्या शेतकऱ्यांच्या लाभाची कत्तलखाने झाली आहे. “इसेन्शियल कमोडिटी एक्स” ब्रिटिशांनी मंजूर केला होता. तेव्हापासून आजपर्यंत शेतकऱ्यांना आपला माल या बाजार समित्यांनी ठरविलेल्या हमीभावानुसारच विक्री करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना जागतिक भाव मिळत नाही. शेतकऱ्यांना अधिक लाभापासून दूर ठेवल्या जात आहे .जोपर्यंत मुक्त बाजारपेठेमध्ये विक्री करण्याची व्यवस्था शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत त्यांना उन्नती करता येणार नाही, असे मत हळद वायदे व्यवहारावर बोलताना शेतकरी संघटनेचे नेते गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी व्यक्त केले.



दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे हळद वायदे व्यवहारावर कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून गुणवंत पाटील हंगरगेकर आणि ललित बहाले हे शेतकरी संघटनेचे नेते होते. मंचावर दिनेश शर्मा, श्रीकांत देशपांडे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची प्रमुख उपस्थिती होती.



ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या “इसेन्शियल कमोडिटी अॅक्ट “त्यामधून तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी चार वस्तू मोकळ्या केल्या होत्या. परंतु एमपी गव्हर्मेंट च्या आग्रहामुळे सोयाबीनच्या उत्पादनाला त्या ॲट मध्ये समाविष्ट करून मुक्त बाजारपेठेपासून तोडले. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक नुकसान सोसावे लागत आहे. तसेच शासनाने हळदीला सुद्धा जागतिक मार्केट पासून तोडले तर शेतकऱ्यांचे बेहाल होणार आहे. शेतकऱ्यांनी हळदी सारख्या उत्पादनाचा अधिक भाव वायदे बाजारातच मिळू शकते. म्हणून शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या अर्थ मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली असलेल्या एनसीडीईएक्स सारख्या कंपन्यांच्या माध्यमातून हळदीची मुक्त बाजारपेठेमध्ये विक्री करून अधिक लाभ घ्यावा, असे गुणवंत पाटलांनी आवाहन केले आहे.



मुक्त बाजारपेठेचे तज्ञ दिनेश शर्मा यांनी वायदे बाजारा शिवाय शेतकऱ्यांची उन्नती नाही, यावरच भर दिला. शेतकऱ्यांच्या मालाच्या लागवडीच्या वेळेस भाव अधिक असतो आणि उत्पन्न हाती आल्यानंतर भाव कमी होतो. या परिस्थितीत हळद उत्पादक शेतकऱ्यांना हळदीच्या किमतीच्या चढउतारापासून संरक्षण करण्याचे कार्य वायदे बाजारच करू शकतो. त्यासाठी भविष्यातील किमतीचा शोध घेणे आणि किमतीमधील जोखमीचे व्यवस्थापन करण्याचे कार्य एनसीडीईएक्स च्या माध्यमातून होत आहे. त्याद्वारे शेतकरी पेरणीच्या वेळेसच असणारा भाव निश्चित करू शकतो.हळदीचे उत्पादन झाल्यानंतर चा भाव जरी कमी असला तरी लागवडीच्या वेळेस निश्चित केलेला भावच शेतकऱ्यांना मिळण्याचा एक प्रकारचा करार झालेला असतो. म्हणून ही बाब शेतकऱ्यांच्यासाठी फायदेशीर असते.
उदाहरणार्थ हळद लागवडीच्या वेळेस हळदीला 25 हजार रुपये क्विंटलला भाव असेल आणि त्या भावाचा करार शेतकऱ्याने केला असेल, तर हळदीच्या उत्पादनाचा वेळेस 20000 रुपये जरी भाव झाला .तरी शेतकऱ्याला 25000 रुपये प्रमाणे पैसे मिळणार असते. अशी व्यवस्था वायदे बाजारात असते .म्हणून याविषयीच्या तांत्रिक बाबी शेतकऱ्यांनी समजून घेऊन अधिक लाभ पदरात पाडून घ्यावा. वायदे बाजारात मालाची डिलिव्हरी करण्याची गरज नसते,असेही ते म्हणाले.
शेतकरी संघटनेचे विदर्भातील नेते ललित बहाले यांनी खुल्या वायदे बाजारात शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनाची विक्री केल्यास, कशा प्रकारे अधिक भाव मिळतो, याविषयीचे विश्लेषण केले.परुळेकर यांनी एनसीडीईएक्स ही स्वतः खरेदी करत नाही आणि विकतही नाही परंतु खरेदी करणारा व विक्रेता यांच्यात मध्यस्थी करणारी कंपनी असल्याचे सांगितले. एनसीडीईएक्स चे स्वप्निल पैठणे यांनी हळदीच्या किमतीमध्ये होणारी चढ-उतार, हळदीची क्वालिटीचे मोजमाप ,राष्ट्रीय नियमावली , वेअर हाऊस च्या आरक्षणाची व्यवस्था आणि शेतकऱ्यांना होणारा फायदा या विषयी प्रेझेंटेशन देऊन विविध संकल्पना स्पष्ट केल्या. त्यावर उपस्थित शेतकरी अभ्यासक आणि एनसीडीएक्सचे अधिकारी यांच्यामध्ये चर्चा घडवून आली.
या कार्यशाळेचा समारोप करताना नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अतिरिक्त किंमत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी या पर्यायाचा विचार करावा . उपस्थितांपैकी ज्यांनी हा प्रयोग केला त्यांचा अनुभव चांगला असल्याचे प्रयोग करणाऱ्यांनी ही सांगितले. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या एनसीडीएक्स च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सक्षम होऊन अधिकाधिक हळदीचा लाभ घेण्यासाठी प्रयोग करायला हरकत नसल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिपादन केले. या कार्यक्रमासाठी अर्थतज्ञ अभ्यासक,शेतकरी व पत्रकार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

