नांदेड| महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे सुधारित वेळापत्रक भारत निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. १ ऑक्टोबर २०२६ ही पात्रता तारीख निश्चित करून ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण तसेच प्रारूप मतदार याद्या तयार करण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे.



सुधारित कार्यक्रमानुसार मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.



प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांना दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. प्राप्त दावे व हरकतींबाबत ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नोटीस देणे तसेच त्यांचा निपटारा करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.



या संपूर्ण प्रक्रियेनंतर महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे. मतदारांनी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपले नाव, पत्ता व इतर तपशील तपासून आवश्यक असल्यास वेळेत दावे किंवा हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

