हिमायतनगर | शहरातील आठवडी बाजारात बुधवारी मोबाईल चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेक नागरिकांच्या खिशातील मोबाईल चोरून नेले. यामध्ये काही उच्चदर्जा आयफोनसह जवळपास दोन ते चार लाख रुपयांपर्यंतचे मोबाईल चोरीला गेल्याची माहिती आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जवळपास १० ते १५ मोबाईल चोरीला गेल्याचा प्राथमिक अंदाज असून, अजून काही तक्रारी पुढे येण्याची शक्यता आहे.


हिमायतनगर शहरातील बाजारपेठ पोलिस ठाण्यापासून ते आंबेडकर चौक, ग्रामीण रुग्णालय, चौपाटी लकडोबा चौक यासह अन्य परिसरात विस्तार वाढला असुन, ग्रामीण भागातील नागरिक बुधवारी बाजार करण्यासाठी मोठी गर्दी करतात. या आठवडी बाजारातील गर्दीचा फायदा घेत अनेकदा चोरट्यांनी मोबाईल चोरल्याच्या घटना घडल्या असल्या तरी बाजार दिवशी पोलिस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची सुरक्षित यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली नाही.

दि.6 आगस्ट रोजी दुपारी 2 ते 3 वाजेच्या दरम्यान बाजार करण्यात गुंग असलेल्या नागरिकांच्या खिशातून मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. एक नाहीतर दहा ते पंधरा नागरीकांचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले असल्याची माहिती आहे. पाच ते सहा नागरीकांनी पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीची तक्रार दाखल केली असुन, काही नागरीकानी स्वत शोध घेण्यासाठी प्रयत्न केले. जवळपास दोन ते चार लाख रुपयांचे मोबाईल चोरीला गेले असल्याने दिवसा ढवळ्या मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ सुरु असल्याने पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.


या घटनांमुळे पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, चोरटे इतक्या सहजतेने मोबाईल लंपास करत असतील तर नागरिकांचे सुरक्षिततेचे काय..? असा सवाल आता जनतेतून विचारला जात आहे. शहरात गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यंदा चोरीच्या घटना कमी झाल्या असल्या तरी दिवसा ढवळ्या मोबाईल चोरटे कसे बाजारात शिरले याचा शोध पोलीस घेणार काय..? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. पोलिसांनी त्वरीत या मोबाईल चोरट्यांचा तपास घेऊन कारवाई करावी, अशी मागणी मोबाईल चोरीला गेलेल्या नागरीकातून केली जात आहे.


