हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी व बोरगडी शिवाराच्या मध्यभागातून गेल्या काही दिवसांपासून अंधाधुंद पद्धतीने गौण खनिज मुरूम उत्खनन सुरू असून, कायद्याची झालर पांघरून सुरू असलेल्या या बेकायदेशीर उत्खननाला संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांचा वरदहस्त असल्याचा गंभीर आरोप शेतकरी व नागरिकांनी केला आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात मुरूम उपसा केला जात असून, हा मुरूम बोरगडी–धानोरा परिसरात सुरू असलेल्या रस्ते कामासाठी वापरला जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.


परिसरातील शेतकरी नागरिकांच्या माहितीनुसार, गौण खनिज अधिनियमाला बगल देत १० फुटांहून अधिक खोल खोदकाम करण्यात येत असून, ट्रॅक्टर व हायवा वाहनांद्वारे रात्रंदिवस मुरूमाची वाहतूक सुरू आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार उघडपणे सुरू असतानाही संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

एका शेतकऱ्याच्या खासगी जमिनीतूनच हजारो ब्रास मुरूमाचे उत्खनन झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यामुळे पर्यावरणाला मोठी हानी पोहोचण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रस्ते कामासाठी केवळ अल्प ब्रास उत्खननाची रॉयल्टी भरून, प्रत्यक्षात मात्र रॉयल्टीच्या शंभर पटीने अधिक मुरूम उपसा केल्याचा आरोप होत आहे. परिणामी शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत असून, गौण खनिज अधिनियमाची सरळसरळ पायमल्ली होत आहे.


या संपूर्ण प्रकरणाची नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तात्काळ दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांनी केली आहे. सिरंजनी–बोरगडी शिवारात सुरू असलेल्या बेसुमार मुरूम उत्खननाची एटीएस पथकामार्फत सखोल चौकशी करून, संबंधित ठेकेदारासह संगनमताने दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी–कर्मचाऱ्यांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करावी, तसेच ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. प्रशासन यावर कारवाई करणार की बेकायदेशीर उत्खननाला अभय देणार? याकडे संपूर्ण हिमायतनगर तालुक्याचे लक्ष लागले आहे.


