नांदेड| नांदेड जिल्ह्यातील पंचायत समिती सभागृह बिलोली येथे आशा व गटप्रवर्तक फेडरेशनचे पाचवे तालुका अधिवेशन १३ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. शिक्षणाच्या जननी माता सावित्रीबाई फुले,माता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अधिवेसनाची सुरवात करण्यात आली.


अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी फेडरेशनच्या अध्यक्षा तथा सीटू राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांची उपस्थिती होती. कॉ.उज्वला पडलवार यांनी आपल्या भाषणात जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात एकीच्या बळावर लढाई तीव्र करून आपले अधिकार टिकून ठेवावे लागतील असे मनोगत व्यक्त केले. आशा व गटप्रवर्तक अत्यंत तुटपुंज्या मानधनांवर काम करतात त्यांना किमान वेतन देऊन कर्मचारी दर्जा देण्यात यावा असेही त्या म्हणाल्या.


सीटू संघटनेमुळेच आज आशा ताईंची नोकरी टिकून आहे व लवकरच राज्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक ताई सेवेत कायम होतील. त्यासाठी संघर्ष अजून तीव्र करावा लागेल असे कॉ.गंगाधर गायकवाड यांनी उदघाटनपर भाषणात संबोधित केले. अधिवेशनाचे प्रस्ताविक शिवनंदा पांचाळ यांनी केले तर सूत्रसंचालन संगीता कटके यांनी केले. सीटू राज्य सचिव तथा जिल्हाध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार यांना क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केल्यामुळे त्यांचा तालुका कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला.


या अधिवेशनात पुढील तालुका कमिटी एकमताने निवडण्यात आली. अध्यक्षपदी लक्ष्मी पवार, कार्याध्यक्ष शांता सिंगटवाड, उपाध्यक्षापदी महानंदा गायकवाड,संगीता कटके, सिंधू दुगाणे, छाया पांचाळ, सचिव पदी छाया विभुते सहसचिव कुसुम चितळे, रेणुका गुजेवार, निर्मला वाघमारे,सुमन जोरगिलवार, रुख्मिणी बुधेवार, सुभद्रा वानोळे, शिवकांता बोंबले, समरीन शेख, वैशाली दुगाणे कोषाध्यक्षा म्हणून शोभा वाघमारे यांची एकमताने निवड करण्यात आली.आभार सिंधू दुगाणे यांनी मानले. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी बिलोली तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक ताईंनी परिश्रम घेतले.




