हिमायतनगर, अनिल मादसवार| मागील महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे व वातावरण बदलल्याने आंब्याच्या झाडांवरील पहिला मोहर मोठ्या प्रमाणात गळून पडला होता. त्यामुळे यंदा आंब्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता मराठी नववर्ष गुढीपाडवा आणि चैत्र महिन्याच्या शुभ मुहूर्तावर आंब्याच्या झाडांना पुन्हा एकदा मोहर फुटू लागल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.


धुवारी आणि वादळामुळे झाडांवरील मोहर गळाल्यानंतर बागायतदार चिंतेत होते. परंतु सध्या अनेक भागात आंब्याच्या झाडांना दुसऱ्यांदा मोहर येताना दिसत आहे. काही झाडांवर आधीच कैऱ्या लागल्या असताना त्याच झाडांना पुन्हा नव्याने मोहर फुटल्याचे चित्र दिसत आहे. या अनोख्या परिस्थितीमुळे यंदाच्या उन्हाळ्यात आंब्याचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता बागायतदार व्यक्त करत आहेत.

हवामान अनुकूल राहिल्यास दुसऱ्या मोहरातूनही चांगल्या प्रमाणात फळधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, दुसऱ्या मोहरामुळे आंब्याच्या बागांमध्ये पुन्हा एकदा आशेचे वातावरण निर्माण झाले असून बागायतदारांकडून आंब्याच्या झाडांची काळजी घेण्यावर भर दिला जात आहे. योग्य व्यवस्थापन आणि अनुकूल हवामान मिळाल्यास यंदा आंब्याचा हंगाम चांगला होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.





