10 हजार चारचाकी वाहन, 700 ट्रॅक्टर , ट्रॅक , आयचर, 50 हजार महिला सहभागी होणार, ठिकठिकाणी भोजन आणि पाण्याची व्यवस्था, 200 भजनी मंडळ, दहा रथांचाही सहभाग असणार
नांदेड| हैदराबाद गॅझेटिअरनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी बंजारा समाजाचा महाएल्गार महामोर्चा उद्या दिनांक 29 सप्टेंबर रोजी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चात मराठवाड्यासह विदर्भ , तेलंगणा, आंध्रप्रदेश , कर्नाटक राज्यातीला लाखो बंजारा बांधव सहभागी होतील अशी माहिती बंजारा समाज महाएल्गार मोर्चा संयोजन समितीचे डॉ. बि. डी. चव्हाण यांनी दिली आहे.


बंजारा समाज एसटी आरक्षण महाएल्गार मोर्चा दिनांक 29 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे . सकाळी 11 वाजता मार्केट कमिटी नवा मोंढा मैदान येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली गेट उड्डाणपूल , चिखलवाडी कॉर्नर , महात्मा गांधी पुतळा मार्गे हा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल . या मोर्चा दहा हजार चार चाकी वाहन , 30 हजाराहूनअधिक टू व्हीलर ,700 हून अधिक ट्रॅक्टर , ट्रक , आणि आयशर यांच्यातून मोर्चेकरी नांदेडमध्ये दाखल होतील.


पारंपारिक वेशभूषेतील 20 हजार महिला या मोर्चा सहभागी होणारा असून पन्नास हजार अधिक बंजारा महिला या मोर्चामध्ये समाजासाठी योगदान देतील. याच वेळी 500 डफडे , पाचशे वाजंत्री , अश्व रथासह 10 रथ , दोनशे भजनी मंडळी हेही या मोर्चात सहभागी होणार आहेत. युवती आघाडी आणि बंजारा स्टुडन्ट असोसिएशन मोर्च्यात सर्वात पुढे राहून मोर्चाची धुरा सांभाळतील. या मोर्चात दिल्लीची रोहिणी बानोत / आडे आणि संजीव कुमार हे प्रेरणा गीत, बंजारा पारंपारिक गीत सादर करत मोर्चेकऱ्यांमध्ये स्फुलिंग चेतावीत राहतील अशी माहिती ही मोर्च्याच्या तयारीच्या अनुषंगाने देण्यात आली आहे.


मराठवाड्यासह विदर्भ , तेलंगणा , आंध्र प्रदेश ,कर्नाटक या राज्यातून येणाऱ्या लाखो मोर्चेकर्यांसाठी ठिकठिकाणी भोजन आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहन पार्किंगची ही व्यवस्था करण्यात आली आहे. हा मोर्चा अत्यंत शिस्तीत पार पडणार असून बंजारा समाजाची ताकद या मोर्चातून दाखवून देण्यात येणार आहे . जोपर्यंत राज्य सरकार हैदराबाद गॅझेटिअर नुसार एसटी अनुसूचित जमाती प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत बंजारा समाज स्वस्थ बसणार नाही असा एल्गार ही या निमित्ताने पुकारण्यात आला आहे.

राज्य सरकारकडे बंजारा समाजाला एसटी तून आरक्षण देण्यासाठी आवश्यक असणारे सर्व पुरावे आहेत. हैदराबाद गॅजेटियर आहे यामध्ये बंजारा समाजाचा आदिवासी म्हणून उल्लेख आहे . 10 जानेवारी 1950 सी पी आणि बेरार सरकारने बंजारा ना एसटीमध्ये समाविष्ट केले आहे . 1871 ते 1931 च्या जनगणनेत बंजारा स्वतंत्र आदिवासी समाज म्हणून नोंदवला गेला आहे . डॉ. बाबासाहेब आंबेडकर , जयपाल सिंग यांनी संसदेतही ही मागणी मांडलेली होती. याशिवाय वेळोवेळी जे आयोग स्थापन करण्यात आले त्या आयोगाने ही बंजारा समाज एसटी दर्जाच्या मान्यतेस पात्र असल्याचे नोंदवले आहे .
यामध्ये लोकूर आयोग 1965 , मंडल आयोग 1980 , न्यायमूर्ती बापट आयोग 2004 , इथात आयोग 2014 , भाटीया आयोग 2014 अशा विविध आयोगाने बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी पात्र ठरवले आहे परंतु जाणीवपूर्वक या समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिले जात नाही. त्यामुळे एसटीमध्ये आदिवासींना सात टक्के आरक्षण आहे या आरक्षणाला धक्का न लावता बंजारा समाजाला स्वतंत्र 3 टक्के आरक्षण देण्यात यावे यानुसार आदिवासींना अ मध्ये तर बंजारा समाजाला ब वर्गवारीमध्ये आरक्षण द्यावे यासाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याचेही डॉ. बि.डी .चव्हाण यांनी सांगितले.


