राज्यातील शक्तिपीठ जोडणाऱ्या रेल्वे तरी सुरू करा – प्रवाशांची मागणी -NNL

किनवट, परमेश्वर पेशवे। शक्तिपीठ महामार्गाला विरोध होत असून, हा महामार्ग झाला नाही तरी चालेल; पण, राज्यातील शक्तिपीठ देवस्थानांना जोडणाऱ्या रेल्वे गाड्या तरी सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे. त्यातूनच छत्रपती संभाजीनगर ते चंद्रपूर आणि परळी वैजनाथ ते नागपूर या दोन रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी पुढे येत आहे.


आदिलाबाद, नांदेड या मार्गावर मागील काही वर्षात एकही नवीन गाडी सुरू झाली नाही. याउलट काझीपेठ ते मुंबई मार्गे वणी, आदिलाबाद, किनवट, नांदेड ही साप्ताहिक रेल्वे बंद करण्यात आली.

विदर्भ, तेलंगणा, मराठवाड्याला विदर्भ आणि तेलंगणाच्या सीमेवर मराठवाड्याच्या शेवटच्या टोकाला आदिलाबाद ते नांदेड मार्गावर सर्वाधिक उत्पन्न देणारे किनवट हे रेल्वेस्थानक आहे. असे असतानाही नव्या गाड्यांचा वाणवा आहे.


परळी ते आदिलाबाद या डेमू गाडीची आसन व्यवस्था गैरसोयीची आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. मराठवाड्यास जोडणारा हा मार्ग आहे. मात्र रेल्वेची अनास्था आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता असल्याने या मार्गावर नवीन रेल्वे गाड्या धावत नाहीत. डेमूऐवजी चांगले कोचेस असलेली रेल्वे सोडावी, अशी प्रवाशांची दोन वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र त्याकडेही रेल्वेचे दुर्लक्ष होत आहे.

दोन रेल्वे सुरू केल्यास होईल गैरसोय दूर
माहूर येथील रेणुका माता आणि प्रभू दत्तात्रयाचे मंदिर, चंद्रपूर येथील महाकाली मातेचे दर्शन सोयीचे व्हावे यासाठी छत्रपती संभाजीनगर ते चंद्रपूर ही नवीन रेल्वे सुरू करावी. तसेच परळी वैजनाथ, माहूर रेणुका माता आणि नागपूर येथील दीक्षाभूमीला जोडणारी परळी वैजनाथ ते नागपूर रेल्वे गाडी सुरू करावी, या मार्गावर दोन रेल्वे गाड्या सुरू झाल्या तर भाविकांची गैरसोय दूर होईल. अशी सर्वसामान्य जनतेत चर्चा चालू आहे.



