उस्माननगर, माणिक भिसे| कंधार तालुक्यातील मौजे आलेगाव येथे दि. १५ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास गावाजवळील अविनाश आंबटवार यांच्या घराशेजारील नारळाच्या झाडावर विज कोसळली. या घटनेत झाड पूर्णपणे जळून काळवंडून कोसळले, मात्र सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.


मागील ऑगस्ट अखेरीपासून उस्माननगर व शिराढोण परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक हेक्टर शेती पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान झाले आहे.



दि. १५ रोजी दिवसभर उकाड्याचे वातावरण होते. दुपारी तीननंतर अचानक हवामान बदलले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. याचदरम्यान आलेगाव येथील झाडावर विज कोसळून ते झाड काळवंडून खाली पडले. मात्र गावावर आलेले संकट झाडावर कोसळल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सायंकाळी आकाशात पुन्हा काळेभोर ढग दाटून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.




