श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा| श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेदरम्यान तलाव परिसरात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या वतीने पाच प्रशिक्षित जीव रक्षकांची नियुक्तत करण्यात आले आहेत.


या जीव रक्षकांमध्ये गजानन हिवरे, गणेश कोमटवार, अशोक नंदाने, वैभव हिरवे व सचिन हिरवे यांचा समावेश आहे. माळेगाव यात्रेतील तलावामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक स्नान तसेच कपडे धुण्यासाठी येत असतात. संभाव्य अपघात टाळण्यासाठी व भाविकांचे प्राण सुरक्षित राहावेत यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी पुढाकार घेतला.

त्यांच्या सूचनेनुसार नांदेड-वाघाळा महानगरपालिकेने येथे पाच जीव रक्षकांची सेवा उपलब्ध करून दिली आहे. हे जीव रक्षक तलाव परिसरात सतत सतर्क राहून नागरिकांना पाण्यात उतरताना काळजी घेण्याचे मार्गदर्शन करत आहेत, तसेच धोकादायक ठिकाणी जाण्यास मनाई करत संरक्षणाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडत आहेत.


विशेष म्हणजे या जीव रक्षकांनी नांदेड शहरात गणपती व नवरात्रोत्सवाच्या काळातही उत्कृष्ट कार्य केलेले आहे. यंदा पहिल्यांदाच माळेगाव यात्रेत जीव रक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, यात्रेतील सुरक्षिततेला मोठे बळ मिळाले आहे.


