देगलूर l देशाचे लोकप्रिय पंतप्रधान जननायक नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्र शासन व महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने देशभर १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान “सेवा पंधरवाडा” आयोजित करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या अभियाना अंतर्गत भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले.


या शिबिराचे उद्घाटन श्रीमती शीतलताई रावसाहेब अंतापुरकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व अधिकारी, कर्मचारी, रुग्ण व उपस्थित मान्यवरांनी सामूहिक अवयव दान शपथ घेतली. यावेळी विविध आजार निदान व उपचारासाठी स्वतंत्र स्टॉल्स उभारण्यात आले होते. प्रतीकात्मक स्वरूपात फळवाटप, आयुष्मान कार्ड व वयवंदना कार्ड वाटप देखील करण्यात आले.


या महाआरोग्य शिबिरात आज एकूण ८९३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. महिलांसाठी रक्तदाब, मधुमेह, दंतरोग, नेत्ररोग, स्तन व गर्भाशय रोग, मुख व कर्करोग तपासणी, गर्भवतींसाठी लसीकरण, सोनोग्राफी, क्षयरोग तपासणी, किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी, सिकलसेल आजार तपासणी, पोषण आहार व मानसिक आरोग्य मार्गदर्शन अशा विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच बालकांची तपासणी, आयुष उपचार, रक्तदान शिबिर, अवयव दान नोंदणी, आयुष्मान व आभा कार्ड तयार करणे इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे यांनी शिबिरस्थळी भेट देऊन पाहणी केली. रुग्णांच्या समस्या जाणून घेत उपाययोजना सुचवल्या.


त्यांनी व वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश देवणीकर यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय देगलूरचे अधीक्षक डॉ. नरेश देवणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी, वैद्यकीय स्टाफ व कर्मचारी यांनी मोठे परिश्रम घेतले…




