नांदेड| आपल्या मुला मुलींचा कल कोणत्या क्षेत्रात आहे हे पाहूनच त्यांना पालकांनी आपले क्षेत्र निवडू द्यावे. प्रत्येक क्षेत्रात संधी उपलब्ध होत असतात. पालकांनी आपल्या अपेक्षा, इच्छा किंवा आकांक्षा त्यांच्यावर लादू नयेत. विशेषतः मुलींना अधिक बंधनं घातली जातात. परंतु अभिनय क्षेत्रात मी माझ्या वडिलांच्या प्रोत्साहनामुळेच माझे करिअर करु शकले. म्हणूनच मुलींना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात जाऊ द्या असा सल्ला पाणी चित्रपट फेम अभिनेत्री माधुरी लोकरे यांनी दिला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी पंडित पाटील बेरळीकर, प्रमुख पाहुणे म्हणून सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा साहित्यिक कवी अनुरत्न वाघमारे, कवी प्रल्हाद घोरबांड, राजेश लोकरे, मीनाक्षी कोकुलवार, संयोजक तथा आकाश प्रकाशन युट्यूब चॅनलचे संचालक कवी पांडुरंग कोकुलवार, निमंत्रक प्रज्ञाधर ढवळे आदींची उपस्थिती होती. येथील आकाश प्रकाशन युट्यूब चॅनलच्या वतीने शहरातील मालेगाव रोड स्थित पवननगर येथे दीपावली समारोप कार्यक्रम आणि कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. आकाश प्रकाशन युट्यूब चॅनलच्या वतीने दीपावली निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यानंतर दि. ७ रोजी समारोप कार्यक्रम संपन्न झाला.
स्वामी विवेकानंद यांच्या मूर्तीचे पुष्पपुजन केल्यानंतर रीतसर कार्यक्रमास प्रारंभ झाला. मान्यवरांच्या सत्कारानंतर माधुरी लोकरे, नागोराव डोंगरे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर झालेल्या गीतगायन आणि कविसंमेलन कार्यक्रमात पंडित पाटील बेरळीकर, अनुरत्न वाघमारे, प्रल्हाद घोरबांड, गझलकार चंद्रकांत कदम, शरदचंद्र हयातनगरकर, थोरात बंधू, साहेबराव कांबळे, प्रज्ञाधर ढवळे, पांडुरंग कोकुलवार, प्रशांत गवळे, योगेश गच्चे, अशोक कुबडे, रुपाली वागरे वैद्य, पंचफुला वाघमारे, पांडुरंग नलबलवार यांनी स्वरचित कवितांचे सादरीकरण व गीतगायन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रज्ञाधर ढवळे यांनी केले. भूमिका पांडुरंग कोकुलवार यांनी मांडली. सूत्रसंचालन रणजित गोणारकर यांनी तर आभार शंकर गच्चे यांनी मानले. दरम्यान माधुरी लोकरे यांचा अभिनय क्षेत्रातील यशाबद्दल चॅनलच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या वेळी शिवाजी कोकुलवार, मनोहर संगमवार, नागभूषण दुर्गम, गणेश भुसा, राजीव राचा, अभय कुरपतवार, अनंत नातेवार, दिलिप डांगे, गजानन पावडे, संजय मोरे, माधव कांबळे, एकनाथ कार्लेकर, धुसे, गंदेवाड, जयंती ढवळे, युवराज ढवळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश प्रकाशन युट्यूब चॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.