हिमायतनगर,उत्कर्ष मादसवार| तालुक्यातील मौजे कारला येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दक्षिणामुखी हनुमान मंदिरात सुरू झालेल्या अखंड हरीनाम सप्ताहाने संपूर्ण गाव भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. धार्मिक उत्साह आणि सामूहिक सहभागामुळे परिसरात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली आहे.


सप्ताहाच्या प्रारंभी गावातील युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा अखंड गजर सुरू असून, “हरे राम-हरे कृष्ण”च्या जयघोषाने वातावरण दुमदुमले आहे.

कथा मंडप कार्यक्रमस्थळी आकर्षक सजावट, फुलांची आरास आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे भाविकांना प्रसन्न अनुभव मिळत आहे. सप्ताहादरम्यान दररोज कीर्तन, प्रवचन, भजन व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.


तर दुपारी शिवपुराण कथेचे निरूपण ह.भ.प. बालयोगीणी मुक्ताईनाथ गुरू महेश्वरी नाथ यांच्या वाणीतुन होत आहे. दररोज सायंकाळी आठ ते दहा या वेळेत प्रसिद्ध हरिभक्त परायण महाराजांचे कीर्तन होत असून या कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गावातील महिला पुरुषांची गर्दी होते आहे.

या उपक्रमामुळे कारला परिसरात धार्मिक व सांस्कृतिक एकात्मतेचे सुंदर चित्र पाहायला मिळत असून, सप्ताहभर भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. आयोजकांनी सर्वांनी या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे



