देगलूर, गंगाधर मठवाले| त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ, पत्रकार संरक्षण समिती देगलूरच्या वतीने करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. या हल्ल्यातील सर्व दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.


२० सप्टेंबर २०२५ रोजी ‘झी २४ तास’चे ब्युरो चीफ योगेश खरे, ‘साम टीव्ही’चे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि ‘पुढारी न्यूज’चे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात ताजने गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. हा हल्ला म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला आघात आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

या घटनेमुळे पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात असे हल्ले पुन्हा होऊ नयेत यासाठी ठोस धोरण जाहीर करावे आणि प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार संरक्षणासाठी विशेष सेल स्थापन करावा, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.


या मागणीचे निवेदन देगलूर उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांना देण्यात आले. यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष शेख असलम, सचिव गजानन टेकाळे, कार्याध्यक्ष धनाजी देशमुख, कोषाध्यक्ष तोहिद काझी, सहकार्याध्यक्ष धनाजी जोशी, सहकोषाध्यक्ष गजानन शिंदे, सहसंघटक प्रभू वंकलवार, सदस्य इस्माईल खान, पत्रकार अनिल पवार, दिव्यग मित्र बालाजी कांबळे, अफान शेख आदी उपस्थित होते.


