श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे | माहूर शहरातील वार्ड क्र. १३ मध्ये झालेले नाली व सीसी रोडचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून वार्डातील सौर लाईटचे काम सुद्धा निकृष्ट दर्जाचे व आद्याप सुरु झाले नसल्याने सदर कामाची चौकशी करून कंत्राटदार एजन्सी विरुद्ध कारवाई करून तात्काळ वार्डातील सौर लाईट सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पवन चौहान यांनी न.प चे मुख्यधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शहरातील वार्ड क्र. १३ मध्ये करण्यात आलेले सीसी रोड व नालीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून अनेक कामे अर्धवट ठेवण्यात आलेली असल्याने नालीमधून वाहत आलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्याने वार्डातील नागरिकांना प्रचंड त्रास होवून त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे पवन चौहान यांनी निवेदनात नमूद केले आहे.सीसी रोड व नालीची बांधकामे अत्यंत थातूरमातुर रित्या निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून व्यवस्थित क्र्युरिंग न करताच केले असल्याने अल्पावधीतच झालेले बांधकाम बऱ्याच ठिकाणी उखडलेले दिसत आहे.
शिवाय वार्डात सौर लाईटचे काम करण्यात आले ते सुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले असून अद्याप पर्यंत लाईट सुद्धा सुरु केलेले नाही.त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत असून किमान सणासुदीच्या व इतर यात्रा काळात तरी सौर लाईट व्यवस्थितपणे सुरु ठेवणे गरजेचे असल्याची खंत पवन चौहान यांनी व्यक्त केली असून सदर बांधकामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदार एजन्सी विरुद्ध कारवाई करण्यात यावी. तसेच तात्काळ वार्डातील सौर लाईट सुरू करून देण्यात यावी अशी मागणी चौहान यांनी निवेदनातून केली आहे.