नांदेड,अनिल मादसवार | ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान हे केवळ एका धर्मापुरते मर्यादित नव्हते, तर सत्य, धर्म, स्वातंत्र्य आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी होते. त्यांच्या बलिदानातून प्रत्येक पिढीला निर्भीडपणे अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळेच त्यांच्या विचारांचा वारसा राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमात ते बोलत होते. या भव्य समागमास लाखो भाविकांची उपस्थिती लाभली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनिडला पवन कल्याण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, पालकमंत्री अतुल सावे, दिल्ली सरकारचे मंत्री सरदार मनजिंदर सिंग सिरसा, माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, डॉ. भागवत कराड, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, बालाजी कल्याणकर, श्रीजया चव्हाण, जितेंद्र अंतापूरकर, रवींद्र चव्हाण, राज्य अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, अल्पसंख्याक विभागाचे सचिव रुचेश जयवंशी, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंग, शहीदी समागम समितीचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक यांची उपस्थिती होती.


मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या सर्वोच्च बलिदानामुळे देशात धर्म, आत्मसन्मान आणि स्वातंत्र्यासाठी लढण्याची नवी चेतना निर्माण झाली. हा कार्यक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून, प्रत्येक गाव, वाडी-वस्तीपर्यंत त्यांचा इतिहास पोहोचवण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. शीख गुरूंचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी तो शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.



महाराष्ट्र–पंजाब ऐतिहासिक नाते अधिक दृढ
श्री गुरू नानक देवजी यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणारे नऊ समाज प्रथमच लाखोंच्या संख्येने एकत्र येत असल्याने हा समागम सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा ठरला आहे. संत नामदेव महाराजांचे अभंग श्री गुरू ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट असल्याने महाराष्ट्रातील वारकरी परंपरा आणि शीख समाजातील अतूट नाते अधोरेखित होते. श्री गुरू गोविंद सिंग महाराजांच्या दीर्घ वास्तव्यामुळे नांदेडची भूमी पावन झाल्याचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान हे संपूर्ण मानवजातीच्या सांस्कृतिक व धार्मिक स्वातंत्र्यासाठी होते. जुलमी सत्तेविरोधात विचारस्वातंत्र्य आणि धर्मस्वातंत्र्याचे संरक्षण करणारे हे बलिदान इतिहासातील अद्वितीय उदाहरण आहे.
पवन कल्याण यांचे मराठीतून संबोधन – आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी मराठीतून भाषणाची सुरुवात करत महाराष्ट्रात पुन्हा येण्याचा आनंद व्यक्त केला. गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन युवकांनी देशाला एकसंध व शक्तिशाली बनवण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
दिल्लीचे मंत्री सरदार मनजिंदर सिंग सिरसा, संत ज्ञानी हरनाम सिंग, तसेच गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंग यांनीही गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचे महत्व विशद करत हा समागम समाजाला जोडणारा ठरत असल्याचे मत व्यक्त केले. प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री गुरू ग्रंथ साहिबजींचे दर्शन घेतले व पंच प्यारे यांचा सन्मान केला. प्रास्ताविक शरदराव ढोले यांनी केले तर आभार रामेश्वर नाईक यांनी मानले.

