नांदेड, अनिल मादसवार। जिल्ह्यातील सर्वच समाजघटकांतील गुणवंत विद्यार्थ्यांना नीट व जेईई या प्रवेश परिक्षांचे पूर्व प्रशिक्षण शासनाकडून निःशुल्क तसेच, विद्यावेतनातून व निवासी स्वरुपात व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील असून राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांची याबाबत लवकरच भेट घेऊन पाठपुरावा करु अशी ग्वाही हदगांव-हिमायतनगरचे लोकप्रिय आ. माधवराव पाटील जवळगांवकर यांनी दिली.


महाराष्ट्र शासनाच्या बार्टी, सारथी,महाज्योती व आदिवासी तसेच,अल्पसंख्याक विकास विभागाकडून जात प्रवर्गनिहाय गुणवंत विद्यार्थ्यांना निट व जेईई परिक्षांचे पूर्व प्रशिक्षण निवासी स्वरुपात व विद्यावेतनातून निःशुल्क पद्धतीने नांदेड जिल्ह्यातच मिळावे यासाठी प्रयत्न करण्याची मागणी आ.माधवराव पाटील जवळगांवकर यांची भेट घेऊन राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी व नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव मा.भवरे यांनी केल्यानंतर त्यांनी यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला.


महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पूणेच्या माध्यमातून एस.एस.सी.उत्तीर्ण असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नागपूर, पुणे,छत्रपती संभाजीनगर,लातूर या ठराविक जिल्ह्यातच प्रत्येकी १०० विद्यार्थीप्रमाणे नीट,जेईई प्रवेश पूर्व परिक्षांचे प्रशिक्षणासाठी पूर्व नोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यासाठीची जाहिरात नुकतीच वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेली असून सदरच्या ठिकाणी अन्य जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे व मर्यादीत जागांमूळे अनेकजण लाभापासून वंचित ठरणार आहेत. सदर प्रवर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांचे कुटूंबात आर्थिक सबलता असेल याबाबतची खात्री नसल्याने त्यांना गुणवत्तेनुसार मिळालेल्या अन्य जिल्ह्यात वास्तव्यास राहून शासनाकडून प्राप्त विद्यावेतनातून अभ्यासासाठीचे साहित्य, अभ्यासिका वा वास्तव्याचे ठिकाण,भोजन- नाश्ता आदींसाठीचा खर्च करुन प्रशिक्षण घेणे अत्यंत जिकरीचे ठरणारे आहे.


त्यामूळेच अनुसूचित जाती प्रवर्गासह अन्य जात प्रवर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनाही लाभ व्हावा या दृष्टिकोनातून शासनाच्या विविध विभागांच्या अंगीकृत जात प्रवर्गनिहाय कल्याणासाठी कार्यरत असलेल्या बार्टी, सारथी,महाज्योती या स्वायत्त संस्था व आदिवासी आणि अल्पसंख्याक विकास विभागाकडून नांदेड जिल्ह्यात निवासी स्वरुपात विद्यावेतनाद्वारे व निःशुल्क स्थानिक विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देऊन प्रशिक्षण वर्गासाठीची मान्यता व नोंदणीसह प्रशिक्षण वर्ग यंदाच्याचं शैक्षणिक वर्षात सुरु व्हावेत यासाठी आपण पुढाकार घेऊन पाठपुरावा करण्याची विनंती आ. माधवराव पाटील जवळगांवकर यांची भेट घेऊन राष्ट्रवादी किसान सभेचे मा.प्रदेश प्रतिनिधी व नांदेड जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव भवरे यांनी केली होती.त्यास दुजोरा देत त्यांनी यासाठी प्रयत्न व पाठपुरावा करण्याचे अभिवचन दिले.



