नांदेड| ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आता देशभर सुरू आहे. या धोरणाबद्दल बरेवाईट बोलले जात असले तरी कोणत्याही धोरणाचे यशापयश हे त्या धोरणाच्या अंमलबजावणीवर अवलंबून असते. सध्याच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांच्या मानसिकतेतही बदल व्हायला हवा’, असे प्रतिपादन जेष्ठ शिक्षणतज्ञ आणि माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.


स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क’ या विशेष व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. व्याख्यान सत्राच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे होते. यावेळी कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. सूर्यकांत जोगदंड, डॉ. डी. एन. मोरे, डॉ. संतराम मुंडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. डी.एम. खंदारे, अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. पी. विठ्ठल, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर यांची विशेष उपस्थिती होती.


पुढे बोलताना डॉ. विद्यासागर म्हणाले की, ‘या पुढच्या काळात कौशल्य विकासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. केवळ लिहिणे वाचणे किंवा पदवी मिळवणे एवढेच शिक्षणाचे उद्दिष्ट नाही, तर विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विकास करणे महत्त्वाचे आहे. यासाठी आपल्याला अध्ययन आणि अध्यापन पद्धतीत आमुलाग्र बदल करावा लागेल. विद्यार्थ्यांना नवीन पद्धतीने शिकवावे लागेल. शिवाय विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची क्षमता शिक्षकात असायला हवी.’


कुलगुरू डॉ. चासकर यांनी अध्यक्षीय समारोप करताना ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या’ संदर्भात भाष्य केले. प्रारंभी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे यांनी केले. यावेळी विद्यापीठातील विविध संकुलाचे संचालक, अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पी. विठ्ठल यांनी तर आभार डॉ. जगदीश कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप एडके, रशीद शेख, प्रदीप बिडला यांनी प्रयत्न केले.



