नांदेड| नांदेड शहरातील प्रभाग क्र. 03 व 10 मधील गोविंदनगर, अमन कॉलनी, महेबुबनगर, नुरी चौक या भागामध्ये रोड व ड्रेनेजचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. हे काम तात्काळ थांबवून गुत्तेदारावर कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नांदेड काँग्रेस शहरचे जिल्हा प्रवक्ता गजानन सावंत यांनी मनपा आयुक्त नांदेड यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
सदरील कामाची तक्रार मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम यांच्याकडे फोन व व्हॉट्सअप द्वारे करून सुद्धा यावर कुठल्याही प्रकारची दखल न घेता संबंधीत गुत्तेदारावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. वरील परिसरातील होत असलेले निकृष्ट दर्जाचे झाले असून जिजाऊ चौक गोविंदनगर येथे भला मोठा खड्डा खोदून तसाच ठेवल्याने त्या ठिकाणी मौत का कुआ असे स्वरूप आलेले आहे. दररोज लहान बाळांसह वयोवृद्ध नागरिकांना याच रस्त्याचा उपयोग करावा लागत असल्याने त्यात पडून अनेकजण जखमी झाले आहेत. याच ठिकाणी खड्याला लागूनच महावितरणचा विद्युत डि.पी. उघडाच आहे. त्यामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यास सर्वस्वी जबाबदार मनपा प्रशासन व संबंधीत गुत्तेदार राहिल. संबंधीत गुत्तेदाराशी संपर्क करून विनंती केली असता उडवाउडवीचे उत्तर देवून फोन सुद्धा उचलत नाहीत. संबंधीत गुत्तेदाराचे देयक तात्काळ थांबवून रितसर कार्यवाही करावी अन्यथा नांदेड वाघाळा शहर महानगरपालीकेसमोर परिसरातील नागरिकांसह लोकशाही पद्धतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा नांदेड काँग्रेस शहरचे जिल्हा प्रवक्ता गजानन सावंत यांनी मनपा आयुक्त नांदेड यांना निवेदनाद्वारे दिला आहे.