कंधार, सचिन मोरे| गत चार दिवसापासून सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे कंधार तालुक्यातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होऊन, सदरच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर यांनी कंधार तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून, बाधित पिकांचे तात्काळ पंचनामे करा! अशी मागणी कंधार तहसीलदाराकडे केली आहे.


अतिवृष्टीमुळे भिंत अंगावर कोसळून मृत्युमुखी पडलेल्या कोटबाजार येथील शेख कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. नांदेड जिल्ह्यासह कंधार तालुक्यात गेल्या चार दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. नदी – नाल्याला पूर आला असून, तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत.


कंधार तालुक्यातील अनेक भागातील नदी – नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, अनेक घरांची पडझडही झाली आहे. अशा परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मानसिक धीर देऊन शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांनी दि. १७ ऑगस्ट रोज रविवारी कंधार तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला.



या दौऱ्यात धर्मापुरी, चिंचोलीसह अनेक नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. कोटबाजार ग्रामपंचायतचे माजी सदस्य शेख नासेर शेख अमीन व पत्नी शेख हसीना शेख नासेर(विद्यमान ग्रामपंचायत सदस्य) या दोघांचा घराची भिंत अंगावर कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता.प्रवीण पाटील चिखलीकर यांनी आपदग्रस्त शेख यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर देत त्यांचे सांत्वन केले.व शासनाकडून सर्वतोपरी आर्थिक मदत मिळवून देण्याचा विश्वास दिला.

या वेळी प्रवीण पाटील चिखलीकर यांनी कंधारच्या तहसीलदारांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत या भागातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतीचे पंचनामे तात्काळ करावे, आणि शासनाकडून नुकसान ग्रस्त शेतकरी आणि ज्यांच्या घराची पडझड झाली अशा लोकांना घरपडी मिळवून देण्यासाठी तातडीने पाठपुरावा करण्याच्या सूचना केल्या आहेत. या प्रसंगी नायब तहसीलदार उत्तम मुदिराज, शंकरराव नाईक,सुधाकरराव कौसले यांच्यासह धर्मापुरी येथील सरपंच व गावातील नागरिक आणि शेतकरी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


