नांदेड| ‘स्वच्छता ही सेवा’ प्रत्येक व्यक्तीच्या मनात रुजली पाहिजे. प्रत्येक भारतीयांनी तसा सेवाभाव जोपासला पाहिजे. समाजातील प्रत्येकांनी पहिल्यांदा स्वत:च्या मनातील स्वच्छता करून नंतर परिसराची स्वच्छता करायला हवी. त्यामुळे मन स्वच्छ असेल तर परिसरही स्वच्छ करता येतो. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्वच्छता हा संस्कार बालपणापासून रुजवावेत. असे मत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित दि. २८ सप्टेंबर रोजी ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत स्वच्छता रॅली च्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

यावेळी कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, मुंबई विद्यापीठातील डॉ. सुशील शिंदे, डॉ. रमेश देवकर, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील, वित्त व लेखाधिकारी डॉ. मोहम्मद शकील, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने यांची उपस्थिती होती. पुढे कुलगुरू डॉ. चासकर म्हणाले, आपल्या कचऱ्याचे व्यवस्थापन आपण स्वतः करावेत व त्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करावा. प्रत्येकांनी दररोज कमीत-कमी एक तास स्वच्छता करावी. समाजामध्ये स्वच्छता जनजागृती करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

सभी रोगों की एक दवा, घर मे रखो साप सफाई, हम सब का एक ही नारा, साफ सुथरा देश हो हमारा, थिंक क्लीन, युज डस्टबीन, ग्रीन सिटी, क्लीन सिटी, माय ड्रीम सिटी अशा प्रकारच्या घोषणा देत विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारती समोरून विद्यापीठ परिसरामध्ये रॅली काढून जनजागृती करण्यात आली.
