नांदेड| देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळात तुमचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला, त्यामुळे तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात,भारतीय जनता पार्टी हा विचारांचा पक्ष आहे, हा पक्ष कोणाच्याही मालकीचा नाही, तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पक्षात काम करीत असताना मतभेद असावेत परंतु मनभेद असता कामा नये. पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी सर्व मतभेद बाजुला ठेवून एकत्रित काम केल्यास आगामी लोकसभा आणि नऊ विधानसभांवर महायुतीचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास खासदार डॉ.अजित गोपछडे यांनी देगलूर येथील आढावा बैठक व भव्य पक्ष प्रवेश मेळाव्यात व्यक्त केला.
देगलूर येथे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाची आढावा बैठक आणि भव्य पक्षप्रवेश मेळावा नुकताच पार पडला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खा.गोपछडे म्हणाले, भाजपात सर्व कार्यकर्त्यांना न्याय मिळतो, त्यांचा सन्मान केला जातो. पक्षाकडे मी तीन वेळा लोकसभेची उमेदवारी मागितली, डॉ. धनाजीराव देशमुख ,स्व.संभाजीराव पवार, डी.बी.पाटील, प्रतापराव पाटील चिखलीकर यांना पक्षाने संधी दिली. मला उमेदवारी मिळाली नसली तरी या सर्व उमेदवारांचा मी प्रचार प्रमुख होतो. एकदा बिलोली विधानसभेची उमेदवारी मागितली. गेली 40 वर्षांपासून मी पक्षाचा झेंडा हाती घेऊन काम करीत आहे. आज मला पक्षाने राज्यसभेत संधी दिली.
बिलोली विधानसभेचा पक्षाचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही, उमेदवाराबाबत जनतेचा कौल, बुथ प्रमुख, शक्तीप्रमुख, विस्तार, विधानसभा प्रभारी, लोकसभा प्रमभारी, संयोजक, संघटनमंत्री सर्वांचा सकारात्मक अहवाल जाईल, त्याच उमेदवाराच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार आहे. देगलूर भागातील भारतीय जनता पार्टीचे संघटन मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागावे, नाराज कार्यकर्त्यांच्या घरी जावून त्यांची समजूत काढावी, पक्षाचे काम प्रामाणिकपणे पार पाडावे, पक्षश्रेष्ठी तुमचा निश्चितच विचार करील, असेही आवाहन खा.डॉ.गोपछडे यांनी यावेळी केले.