हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव व हिमायतनगर तालुक्यात कोणतेही अवैध धंदे चालणार नाहीत. तसेच डीजेला अनावश्यक परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट मत नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी व्यक्त केले.


२१ ऑगस्ट २०२५ रोजी हदगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीची बैठक व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार सुभाष वानखेडे, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, शिवसेना जिल्हा प्रमुख विवेक देशमुख, गोपाळ सारडा, कृष्णा पाटील, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, महावितरणचे अधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


यावेळी पुढे बोलताना पोलीस अधीक्षक अविनाश कुमार म्हणाले की, “गुन्हा हा साधा असो वा गंभीर, तो आता हलक्यात घेण्याची वेळ राहिलेली नाही. एका क्लिकमध्ये तुमचा संपूर्ण गुन्हेगारी इतिहास कंपन्यांना दिसतो. त्यामुळे नोकरीसाठी अन्य शहरात किंवा परदेशात जाताना त्याचा फटका बसू शकतो. युवकांनी याबाबत जागरूक राहावे.” डीजे वाजविण्यासाठी नियमबाह्य परवानगी दिली जाणार नाही. अवैध धंदे कोणत्याही परिस्थितीत चालणार नाहीत असेही त्यांनी ठणकावून सांगितले.


बैठकीनंतर स्थानिक पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी परदेशातील एका टोळीमधून नांदेडच्या युवकाची सुटका कशी करण्यात आली याची माहिती दिली. तसेच हदगाव पोलीस स्टेशनमध्ये वारंवार पोलीस निरीक्षक बदलण्याची पद्धत पुढे ठेवली जाणार नाही, असेही स्पष्ट केले.

माजी खासदार सुभाष वानखेडे यांची सडेतोड भूमिका
या बैठकीत माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी शहर व परिसरात चालणाऱ्या वरली मटका व अवैध धंद्यांवर पोलीस अधीक्षकांसमोरच सडेतोड टीका केली. आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी काही राजकीय नेत्यांच्या अवैध धंद्यांना मिळणाऱ्या सहकार्याबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी शहरातील माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, स्थानिक मान्यवर उपस्थित होते. मात्र या वर्षी सामाजिक दृष्टिकोनातून सूचना मांडण्याची संधी मान्यवरांना न दिल्याबाबत उपस्थितांनी खेद व्यक्त केला.


