नांदेड| लोकशाही सक्षम करण्यासाठी युवकांनी आळस न करता प्रथम आपले नाव मतदार यादीत नोंदविणे आवश्यक आहे. अशा अनेक नवमतदार तरुणांनी यंदा प्रथमच आपले नाव मतदार यादीत नोंदवून इपिक कार्ड सुध्दा प्राप्त केले आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात आज नांदेड दक्षिण स्वीप कक्षाच्यावतीने प्रतिभा निकेतन महाविद्यालयात घेण्यात आलेल्या मतदार जनजागृती कार्यक्रमात कु.वैष्णवी वसंतकुमार साहू व गौरांक ओमप्रकाश दरक या दोन तरुण मतदारांचे कौतुक व अभिनंदन करुन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. किशोर गंगाखेडकर हे तर विशेष अतिथी म्हणून स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाचे सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. घनश्याम येळणे, स्वीप सदस्य प्रा.राजेश कुलकर्णी, प्रा.विजय तरोडे, लेफ्टनंट प्रा.डॉ. किशोर इंगळे, मुख्याध्यापक बालासाहेब कच्छवे, सुनील दाचावार, संजय भालके, कविता जोशी आणि सारिका आचमे उपस्थित होते.
याप्रसंगी युवक मतदार गौरांक ओमप्रकाश दरक यांनी असे मत व्यक्त केले ,की इपिक कार्ड प्रथमच प्राप्त करुन मला मतदार झाल्याचा अभिमान वाटला आणि मी मतदान करणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवतरुणी मतदार वैष्णवी साहू हीने याप्रसंगी सांगितले , की लोकशाहीमध्ये एक एक मत महत्त्वाचे असून मला संविधानाने मिळेलेल्या या अधिकाराचा मी मतदान करुन माझा अधिकार या निवडणूकीत बजावणारच आहे. या मतदार जनजागृती कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा.बालाजी यशवंतकर यांनी व्यक्त केले.