हिमायतनगर, अनिल मादसवार| शहर व परिसरात शेतीतील मोटार पंपाच्या केबल चोरीच्या घटनांनी शेतकरी वर्ग अक्षरशः त्रस्त झाला आहे. ऐन रब्बी हंगाम सुरू असताना शेतकऱ्यांच्या शेतातील सोलार व वीजेवर चालणाऱ्या मोटारींच्या कॉपर केबल्स चोरट्यांनी तोडून नेल्याने सिंचन व्यवस्था कोलमडली आहे.


अस्मानी संकटांनी आधीच हैराण झालेल्या शेतकऱ्यांवर आता चोरट्यांच्या हैदोसाचे नवे संकट कोसळले आहे. मागील महिन्याभरात हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केबल चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, बुधवारी रात्री पुन्हा चोरट्यांनी अनेक शेतात धडक दिली.

हिमायतनगर परिसरात असलेले शेतकरी संतोष गाजेवार, गजानन वारकड, केशव परमेश्वर कुपटे, गणेश गुंडेवार, धरमपुरी तालेवार, रामु नरसिंगा चाटलेवार, सुभाष वारकड, संजय मुधोळकर यांच्यासह 20 ते 25 शेतकऱ्यांच्या शेतातील मोटार पंपाचे कॉपर केबल कुऱ्हाड किंवा अन्य धारधार शस्त्राने तोडून चोरून नेण्यात आले आहे. या चोरीमुळे अनेक शेतांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे.



कारला शिवारातील तपास अजूनही रखडलेला
विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वी कारला शिवारात जवळपास 50 शेतकऱ्यांच्या शेतातील केबल चोरीची घटना घडली होती. मात्र, त्या घटनेचा तपास अद्याप गुलदस्त्यात असून, आरोपी पकडले गेले नसल्याने चोरट्यांचे धाडस वाढल्याची चर्चा शेतकऱ्यांत सुरू आहे. सतत होणाऱ्या चोऱ्यांमुळे शेतकरी वर्ग अक्षरशः वैतागला असून, पोलिसांनी तात्काळ केबल चोरट्यांच्या टोळीचा बंदोबस्त करावा, रात्रीची गस्त वाढवावी आणि पुन्हा कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही याची ठोस खबरदारी घ्यावी.


पोलीस अधीक्षकांचे लक्ष वेधण्याची मागणी
हिमायतनगर तालुक्यात सुरू असलेल्या या केबल चोरीच्या गंभीर घटनांकडे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी वैयक्तिक लक्ष घालून तातडीची कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून जोर धरत आहे. रब्बी हंगामातील पिके वाचवायची असतील तर केबल चोरट्यांवर कठोर कारवाई हाच एकमेव उपाय असल्याची भावना शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे.
