हिमायतनगर,अनिल मादसवार। केंद्र व राज्य शासनाने आमदार खारादाराच्या मागणीची दखल घेऊन हिमायतनगर नडव्यापासून पळसपुर डोल्हारी मार्ग शिरपल्ली जाणारा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत २०२२ मध्ये मंजूर करून कामाला सुरुवात केली. मात्र एकंबा – सिरपल्ली – डोल्हारी – पळसपूर – हिमायतनगर रस्त्याच अर्धवट काम ठेऊन गुत्तेदाराने पलायन केल्यामुळे सर्वसामान्य नागरीकातून संबंधित ठेकदाराविरुद्ध जनप्रक्षोभ वाढला आहे. संबंधित गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे व प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे या रस्त्यावरील तिन्ही गावच्या लोकांना नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. आता पावसाळ्यात देखील रस्त्यावरून ये जा करतांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागणार असून, या अर्धवट रस्त्यामुळे अनेकांना पाठदुखी, कंबरदुखी, मणक्याचे आजार व अपघाताचा सामना करावा लागतो आहे. या रस्त्याच्या अर्धवट कामाकडे नवनिर्वाचित खा. नागेश पाटील आष्टीकर यांनी लक्ष द्यावे आणि रखडलेल्या रस्ता मार्गी लावावा अशी मागणी होऊ लागली आहे.
नांदेड – यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या हिमायतनगर तालुक्यातील एकंबा – सिरपल्ली – डोल्हारी – पळसपूर – हिमायतनगर – पार्डी – एकघरी या ११.९९० किमी रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ७३० लक्ष रुपयांच्या निधी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून उपलब्ध करून देण्यात आला. दि. ७ जानेवारी २०२२ ला खासदार हेमंत पाटील आणि आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते सदरील रस्ता कामाला सुरुवात झाली. एव्हडेच नाहीतर पुन्हा ५ वर्ष या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी ५० लक्ष रुपयाचा निधीची तरतूद करण्यात आली आहे. रस्त्याचे काम ठेकेदार में एम एस सिद्दीकी, औरंगाबाद मार्फत एका सब ठेकेदाराला देण्यात आले आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने या रस्त्याचे काम संत गतीने आणि निकृष्ट पद्धतीने केल्यामुळे २ वर्षाचा कार्यकाळ उलटून गेला अद्यापही या रस्त्याचे काम पूर्ण न करता अर्धवट ठेऊन संबंधित ठेकेदाराने पलायन केल्याने या भागातील ग्रामस्थांनी तीन दिवस साखळी उपोषण केलं तिसऱ्या दिवशी आमदार माधवराव पाटील जवळगावखर यांनी भेट देऊन गुत्तेदारासह अभियंत्याची बैठक घेऊन तात्काळ कामाला सुरुवात करा अश्या सूचना दिल्या. त्यावरून ठेकेदाराने रस्ता कामासाठी रस्त्याच्या बाजूला गिट्टीचे ढग आणून टाकले यास तीन महिने उलटले मात्र अजूनही काम जैसेथेच आहे.
त्यामुळे अर्धवट काम ठेवणाऱ्या गुत्तेदारचे नाव काळ्या यादीत टाकून योग्य कारवाई करून या रास्ता कामाची पुनर्रनिविदा काढण्याची मागणी केली होती. तरीदेखील कासवगतीच्या कामांना गती मिळालीच नाही. आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी यासाठी पाठपुरावा करून अधिकायांना सदर गुत्तेदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्याची सुचना केली होती. त्यावेळी अधिकारी- गुत्तेदार आ. माधवराव पाटील जवळगावकर यांची प्रत्यक्ष गावकऱ्याच्या समोर भेटून गुत्तेदार अधिकारी यानी आठ दिवसात काम सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अजूनही प्रत्यक्षात कामाला काही सुरुवात झाली नसल्यामुळे अखेर वैतागलेल्या नागरीकातून गुत्तेदाराच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे, यादरम्यान हा मार्ग बंदच होते की काय? अशी भिती नागरीकातून व्यक्त होऊ लागली आहे. ता हिंगोलीचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दोन वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या कामाकडे लक्ष केंद्रित करून विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या रस्त्याची कायम कटकट दूर करावी अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.
ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकून अर्धवट राहिलेल्या रस्त्याचे काम चांगल्या गुत्तेदारांमार्फत पूर्ण करून द्या
मागील वर्षी याच कामात अनियमितता दिसून येत असल्याची तक्रार गावकर्यांनी करून निकृष्ट कामाची पोलखोल केली होती. नागरिकांनि केलेल्या तक्रारीनंतर रस्त्याकामासाठी वापरण्यात आलेले मटेरियल रद्द करण्यात आले. काही दिवस ठेकेदाराने काम बंद ठेऊन देखरेख करणारे तत्कालीन अभियंता सुधीर पाटील यांच्या आशीर्वादाने रद्द केलेल्या गिट्टीचा पुन्हा वापर करून थातुर माथूर रस्ता करण्याचा घाट रचला होता. यास ग्रामस्थांचा विरोध होय असल्याचे लक्षात आल्यानंतर ठेकेदारने रस्त्याचे काम अर्धवट ठेऊन पलायन केल्याने आजघडीला ७.३० कोटीच्या रस्त्याचे काम अर्धवट आहे. त्यामुळे या भागातील नागरिक, शेतकऱ्यांना ये- जा करताना मोठ्या अडचणीतून मार्ग काढावं लागतो आहे. पावसाळ्यात तर या रस्त्यावर चिखल होत असल्याने अनेकांची घसरगुंडी होते आहे. रस्त्याचे अजबुतीचे काम पूर्ण होऊन गिट्टी उखडलेल्या रत्स्यावर अनेक अपघात होत असून, रस्ता कामाची गुणवत्ता देखील ढासळली आहे. त्यांउळे करण्यात आलेल्या अर्धवट थातुर माथूर पंतप्रधान ग्रामसडक रस्त्याची उच्चस्तरीय चौकशी करून गुत्तेदारावर दंडात्मक कार्यवाही करून ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकून अर्धवट राहिलेल्या रस्त्याचे काम चांगल्या गुत्तेदारांमार्फत पूर्ण करून द्यावे अशी मागणी केली जात आहे.