हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर ते पळसपूर रस्त्यावरील नडवा नदीवरील पुलाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व नियमबाह्य पद्धतीने सुरू असल्याचा गंभीर आरोप करत, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने दि. 26 जानेवारी 2026 पासून पुलाच्या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे युवा तालुकाध्यक्ष माधव किशन शिंदे यांनी जिल्हा परिषद नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत सविस्तर निवेदन सादर केले आहे. यापूर्वी दि. 7 जानेवारी 2026 रोजी देखील याच विषयावर तक्रार देण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणतीही तांत्रिक चौकशी करण्यात आलेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या या महत्त्वाच्या पुलाच्या कामामध्ये रेतीऐवजी डस्टचा वापर, अंदाजपत्रकात नमूद असलेल्या लोखंडी सळयांऐवजी 8 mm व 10 mm गजांचा वापर, गुत्तेदाराकडून मनमानी काम, संबंधित अभियंते व अधिकारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष व पाठराखण असे गंभीर प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


हा नडवा पूल मराठवाडा व विदर्भाला जोडणारा महत्त्वाचा दुवा असून, दररोज हजारो टन वजनाची वाहने या पुलावरून जातात. निकृष्ट कामामुळे पहिल्याच पावसात पूल वाहून जाण्याची तसेच भविष्यात पूल कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

या संदर्भात आमरण उपोषण करण्यासाठी प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या असून, पुलाच्या कामाची गुण नियंत्रण पथकामार्फत तात्काळ तांत्रिक चौकशी, दोषी अभियंते व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा, कामाचे संपूर्ण देयक थांबवून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे. या मागण्यांची पूर्तता न झाल्यास, दि. 26/01/2026 रोजी नडवा पुलाच्या ठिकाणी शांततेत लोकशाही मार्गाने बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असून, त्यानंतर उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
यासाठी माधव किशन शिंदे – युवा तालुकाध्यक्ष, बालाजी लक्ष्मण ढोणे – शहराध्यक्ष (स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, हिमायतनगर) हे उपोषणास बसणार आहेत. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता (PMGSY), तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना पाठवण्यात आल्या आहेत.

