मुक्रमाबाद l मागील चार दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे तेंदू पत्ता उत्पादनावर संक्रांत ओढावली असून यामुळे तेंदु पत्त्याचे मोठे नुकसान झाले आहे.


मुखेड तालुका हा डोंगराळ तालुका असून या तालुक्यात डोंगराळ भाग व जंगल मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या तालुक्यात तेंदु पत्ता उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते. तालुक्यातील अनेक गावांमध्ये तेंदू पत्ता जमा करणारे मजूर मोठ्या प्रमाणात आहेत.
या तेंदु पत्ता उत्पादनामुळे अनेक कुटुंबातील लोकांना भर उन्हाळ्यात काम मिळत असते व त्यांना चांगले उत्पादनही होत असते त्यामुळे प्रत्येक तेंदू पत्ता जमा करणाऱ्या मजुरांच्या घरात चांगली कमाई होते.

भल्या सकाळी डोंगरात जाऊन तेंदू पत्ता जमा करून घेऊन यायचे व दिवसभर घरी बसून जुळवून, त्याचे पुडे बांधून मग सायंकाळी तेच तेंदू पत्ता संकलन केंद्रावर नेऊन देऊन घ्यायचे यामुळे शेकडो मजुराच्या हाताला भर उन्हाळ्यातही चांगलं काम मिळत असते.
मुखेड तालुक्यातील हाळणी येथे मोठ्या प्रमाणात तेंदु पत्ता संकलन केले जाते या गावात दीडशे पेक्षा जास्त मजूर तेंदु पत्ता संकलन करतात पण मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे तेंदू पत्ता संकलन करणाऱ्या मजुरावरही संक्रांत ओढावली असून त्यांनाही काम नसल्याने ते मजूर घरीच बसून आहेत.

एकीकडे तेंदू पत्ता संकलन केंद्रावर जमा झालेल्या तेंदू पत्त्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे तेंदु पत्त्याचे लाखो रुपयाचे नुकसान होत असून पाऊस पडत असल्याने मजुरांच्या हातालाही काम मिळत नाही त्यामुळे मजूरही हताश झाले आहेत. अवेळी पडणाऱ्या पावसामुळे तेंदू पत्ता संकलन करणाऱ्यांची मोठी पंचायत झाली असून या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.
