हिमायतनगर (अनिल मादसवार) “घरातील नारी स्वस्थ राहिली तर संपूर्ण घर निरोगी राहते. पण तीच आजारी पडली तर कुटुंब त्रस्त होते. त्यामुळे माता-भगिनींनी कोणत्याही आजाराला अंगावर न काढता शासकीय रुग्णालयात तपासणी करून वेळेवर उपचार घ्यावेत,” असे आवाहन हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केले.


हिमायतनगर उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी (दि. 01 ऑक्टोबर) “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार नागेश पाटील आष्टीकर अध्यक्षस्थानी तर हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर उद्घाटक म्हणून उपस्थित होते. धन्वंतरी पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.


महिलांना सशक्त करण्याचा उद्देश – खासदार आष्टीकर म्हणाले की, “शासनाकडून हे अभियान महिलांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी राबविले जात आहे. महिलांना निरोगी, सशक्त आणि आत्मनिर्भर बनवणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.” १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात हे अभियान राबविले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
आमदार कदम यांचे आवाहन – आमदार बाबुराव कदम कोहळीकर म्हणाले की, “महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरण हेच समाज व देशाच्या प्रगतीचे केंद्रस्थान आहे. कोणताही आजार असो, घाबरू नका. शासकीय रुग्णालयात येऊन मोफत तपासणी व उपचार करून घ्या,” असे आवाहन त्यांनी केले.

मोठ्या संख्येने महिला सहभागी – या शिबिरात शहरासह ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. त्यांना विविध आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्यात आले. डॉ. जाधव यांनी मान्यवरांचा सत्कार करून अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांचे आभार मानले. तसेच पुढेही जनजागृती व मोफत आरोग्य शिबिरांद्वारे महिलांना सशक्त करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.



आयोजनात डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा सहभाग – उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विकास वानखेडे, डॉ. रवी वाळके, डॉ. संदीप वागदकर, डॉ. अभिजित बुकतरे, डॉ. अंकुश सदावर्ते, डॉ. सुचिता मामीडवार, डॉ. अल्काराणी मुनेश्वर, डॉ. संतोष किसवे, डॉ. शिवशंकर बुरकुले, डॉ. मेहत्रे यांच्यासह संपूर्ण आरोग्य कर्मचारीवृंदाने परिश्रम घेतले.


