नांदेड| समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने संविधान दिनानिमित्त आज भव्य संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, अतिरिक्त जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड आणि सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात झाली.


रॅलीपूर्वी मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक सचिन खुने, सहाय्यक लेखाधिकारी राहुल शेजूल, समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे, संतोष चव्हाण, संजय कदम, अशोक गोडबोले, गणेश ताडलापूरकर (प्रदेश अध्यक्ष–संविधान बचाव समिती), भगवान ढगे, भिमराव हटकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.


भव्य मार्गक्रमण – संविधान रॅलीचा मार्ग महात्मा फुले पुतळा – अण्णाभाऊ साठे चौक – हिंगोली गेट – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा असा होता. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


संविधान मूल्यांची जोपासना आवश्यक – जिल्हाधिकारी – सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी प्रास्ताविकातून भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती देत नागरिकांनी संविधानातील अधिकार आणि कर्तव्यांचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले म्हणाले, “समता, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि समानता या संविधानिक मूल्यांची जपणूक प्रत्येक नागरिकाने केली पाहिजे.” त्यांनी उपस्थितांना संविधान दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी कर्डीले यांना संविधान प्रास्ताविकेची फ्रेम देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील समाजभूषण पुरस्कारप्राप्त व्यक्ती व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरवही करण्यात आला.

1200 पेक्षा अधिक नागरिक व विद्यार्थी सहभागी – समाज कल्याण कार्यालय, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, विविध महामंडळांचे अधिकारी, तसेच केंब्रिज विद्यालय, तेलगू विद्यालय, प्रतिभा निकेतन, गुजराती हायस्कूल, पंचशील विद्यालय, गुरू गोविंदसिंघजी आयटीआय, शांती निकेतन, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल आदी संस्थांचे विद्यार्थी, स्काऊट-गाईड, एनसीसी पथक, सामाजिक कार्यकर्ते, बार्टीचे समतादूत अशा मिळून सुमारे 1200 विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग नोंदवला.
बँड पथकाची देशभक्ती गीते – पोलिस विभागाच्या बँड पथकाने रॅलीदरम्यान देशभक्तीपर धून सादर केल्या. शालेय विद्यार्थ्यांना समाज कल्याण कार्यालयातर्फे पाण्याच्या बाटल्या, केळी आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. संविधान रॅली जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली.


