नांदेड| महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यास अनुसरून दरवर्षीप्रमाणे स्वच्छता ही सेवा २०२४ ही मोहीम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ग्रामपंचायतींनी राबवावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले.
यावर्षीच्या स्वच्छता ही सेवा या मोहिमेसाठी ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ ही थीम निश्चित केली आहे. या मोहिमेत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात १७ सप्टेंबरला सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करून अभियानाचा शुभारंभ करण्यात येईल. १८ सप्टेंबरला सुरक्षा मित्र शिबिर घेण्यात येणार असून, सफाई मित्रांसाठी एक खिडकी योजनेद्वारे लाभ देण्यात येईल. १९ सप्टेंबरला अस्वच्छ ठिकाणाची कायमस्वरूपी स्वच्छता करण्यात येणार आहे. २० सप्टेंबरला गावातील खाऊ गल्लीच्या ठिकाणी निघणाऱ्या कचऱ्यांची लोकसभागातून स्वच्छता करण्यात येणार आहे. २१ सप्टेंबरला सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे स्वच्छतेच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात येणार आहे.
२२ सप्टेंबरला एकल प्लास्टिक न वापरण्याबाबत जनजागृती, २३ सप्टेंबरला गृहभेटीद्वारे जनजागृती करून ‘एक झाड आईच्या नावे’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. २४ सप्टेंबरला तालुकास्तरावर स्वच्छता ज्योत, २५ सप्टेंबरला टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, २६ सप्टेंबरला सार्वजनिक शौचालयाची साफसफाई व दुरुस्ती, २८ सप्टेंबरला वैयक्तिक स्तरावर कंपोस्ट खतखड्डा व शोषखड्डा निर्मिती करणे, २९ सप्टेंबरला स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या प्रकल्पाचे उद्घाटन करणे, ३० सप्टेंबरला स्वच्छतेचे वाहने व उपकरणांची स्वच्छता व सुशोभीकरण करणे, १ ऑक्टोबरला स्वच्छता प्रतिज्ञा, तर २ ऑक्टोबरला स्वच्छता दिवस साजरा करण्यात येणार आहे. या अभियानात सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले, ग्रामपंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे व जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले आहे.
एक दिवस माझ्या गावाच्या स्वच्छतेसाठी; महाश्रमदानात सहभागी होण्याचे आवाहन
स्वच्छता ही सेवा या मोहिमे अंतर्गत दिनांक १९ सप्टेंबर रोजी राज्यात सर्व एक दिवस माझ्या गावाच्या स्वच्छतेसाठी महाश्रदान करण्यात येणार आहे. नांदेड जिल्हयातील सर्व गावांनी यात सहभागी होऊन सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत श्रमदान करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. यात लोकप्रतिनिधी, अधिकारी कर्मचारी, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक-युवती, सेवाभावी संस्था, समाजसेवक, महिला बचत गट यांचा सहभाग राहणार आहे. या महाश्रमादानात प्राधान्याने धार्मिक/ अध्यात्मिक स्थळे, पर्यटन स्थळ, ऐतिहासिक वास्तू, संस्थात्मक इमारती, वारसा स्थळे, नदी किनारे, कार्यालय, व्यवसायिक व बाजारपेठ आदी परिसरात स्वच्छता करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.