मुंबई/नागपूर| महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था रसातळाला गेलेली आहे. शासन व प्रशासनात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे, त्यांना फक्त मलई खाण्यात जास्त रस असल्याने जनतेच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष नाही. राज्यात मुली व महिला सुरक्षित नाहीत हे सातत्याने होत असलेल्या घटनांवरून दिसत आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे महिला असुरक्षित आहेत पण सरकारने याची जबाबदारी घेऊन गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी व अशा घटनांना पायबंद घालावा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

नागपूर येथे पत्रकारांशी बोलातना नाना पटोले म्हणाले की, पुण्यात शाळकरी मुलीवर ड्रायव्हरने अत्याचार केला, त्याआधी एका कॉलेजमध्ये मुलीवर अत्याचाराची घटना घडली. आणि आता बोपदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना झाली हे महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारी आहे. सावित्रीबाईच्या भूमीत अशा घटना वाढत आहेत हे चिंतेची बाब आहे. महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाईंनी जगाला संदेश दिला त्यांच्याच कर्मभूमीत हे पाप सुरु आहे याला सरकारच जबाबदार आहे. सरकारने याची जबाबदारी घ्यावी. या सरकारचे शेवटचे दिवस राहिले आहेत, त्यांनी काही कारवाई करावी अशी अपेक्षा आहे, तसेही जनतेला हे भाजपा शिंदे सरकार नकोसे झाले आहे. राज्यातील भगिनींना सुरक्षित बहीण हवी आहे याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्रात पोहरादेवीला येत आहेत पण २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी पोहरादेवीला भेट देऊन त्यावेळी रामराव महाराज यांना बंजारा समाजाला आदिवासी जातीत समावेश करण्याचे लेखी आश्वासन दिले होते ते अद्याप पूर्ण केलेले नाही. नरेंद्र मोदी संतांनाही खोटे बोलतात त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार. पोहरादेवीला जगभरातील बंजारा लोक येतात, मोदींच्या जुमलेबाजीला व भूलथापांना आता बंजारा समाज बळी पडणार नाही.

नरहरी झिरवळ यांच्या आंदोलनावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ साली धनगर, आदिवासी समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले होते पण ते पूर्ण केले नाही. आरक्षणाच्या नावावर भाजपा व फडणवीस यांनी जाती-जातीत भांडणे लावली आहेत, आज तेच लोक त्यांना जाब विचारत आहेत. ज्यांनी आश्वासन दिले त्यांना आता त्याची पूर्तता करावी लागणार आहे असे पटोले म्हणाले.

अजित पवारांच्या प्रश्नावर बोलताना, अजित पवार महायुतीतून बाहेर पडतात की त्यांना बाहेर काढले जात आहे हे माहित नाही असेही नाना पटोले म्हणाले. यावेळी एका एनजीओच्या महिला सुरक्षासंदर्भातील ऍप नाना पटोलेंच्या हस्ते लाँच करण्यात आले. हे ऍप महिलांच्या सुरक्षेसाठी महत्वाचे आहे असे पटोले यांनी सांगितले.