नांदेड| शहरातील लोहार गल्लीत असलेल्या एका प्लास्टिक आणि इमिटेमेशन ज्वेलरीच्या दुकानाला बुधवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली होती. हि घटना इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे समजताच पोलिस कर्मचाऱ्यांनी दुकानाची भिंत फोडण्यास अग्निशमन दलास मदत करून अवघ्या दीड तासात आगीवर नियंत्रण मिळवले आहे. यात 70 ते 75 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, तीन गाड्या मार्फत 12 फायर टेंडर ने पाणी मारून आग विजविण्यात यश मिळविले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड शहरातील लोहारा गल्ली येथील लक्ष्मी प्लास्टिक आणि इमिटेमेशन ज्वेलरीच्या दुकानाला बुधवारी सकाळी 8:30 वाजता शॉर्टसर्किट होऊन आग लागली होती. हा प्रकार लक्षात येताच तत्काळ अग्निशमन दलास परिसरातील नागरिकांनी कळविले. अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली. हि दुकाने 20 बाय 80 चे अंडरग्राउंड बेसमेंटमध्ये असल्यामुळे आग मोठ्याप्रमाणात भडका घेत होती. धुरामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कर्मचाऱ्यांना अडचण निर्माण होत होती. हे लक्षात आल्यानंतर इमारतीच्या पाठीमागून इतवारा पोलिस ठाण्याचे अंमलदार बजरंग बोडके व इतवारा स्टाफ यांनी स्वतः हातात हातोडा घेऊन भिंत फोडून आग विझवायला फायर ब्रिगेडच्या टीमला मदत केली.
तसेच जेसीबीचा देखील यावेळी वापर करण्यात आला. भिंत पाडून आगीवर पाणी मारण्याचे काम सुरू ठेवले. यामुळे समोर आणि पाठीमागून आगीवर तीन गाड्यातून एकूण बारा फायर टेंडर द्वारे पाणी मारून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात यश आले. अवघ्या दीड तासात अग्निशमन दलास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीवर मुख्य अग्निशमन अधिकारी के. एस.दासरे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन अधिकारी निलेश कांबळे, मोहम्मद साजिद, पवळे, शिंदे, ताटे, किरकन व वाहन चालक तोटावर, खेडकर यांनी कार्य केले.
या आगीच्या दुर्घटनेमध्ये दुकान मालक गजेंद्र बोबडे म्हणाले कि, जवळपास 70 ते 75 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगितले. याच इमारतीतील फर्स्ट फ्लोर वरती लग्न रुखवत दुकान होते. त्या दुकानातील तीन ते चार लाख रुपयांचे साहित्य वाचवण्यात आले. इमारतीतील दुसऱ्या व तिसऱ्या माळ्यावर इमारत मालक राम वसमतकर हे रहात असल्यामुळे त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. साधारण साडे चार तासात आग पूर्णपणे विझवण्यात आली, असे अग्निशमन दलातील कर्मचारी रईस पाशा यांनी सांगितले.