हिमायतनगर, अनिल मादसवार| ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचा विज पुरवठा खंडित करण्याचा प्रकार चालविला आहे. त्यामुळे हैराण झालेल्या तालुक्यातील वाशी येथील शेतकऱ्यांनी आक्रमक होवून हिमायतनगर येथील महावितरण कार्यालयावर सोमवारी धडक देऊन अभियंता, लाईनमनच्या मनमानी कारभाराबाबत आक्रमक पवित्र घेतला आहे. ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या वतीने कृषी पंपांला सुरळीत वीजपुरवठा करावा या मागणीचे निवेदन देऊन, शेतकऱ्यांच्या फोनला प्रतिसाद न देणाऱ्या अधिकारी व लाईनमन यांची उचलबांगडी करावी. अन्यथा विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा दिला आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामात आर्थिक संकटात आला आहे. खरीप हंगामात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी करून गहू, हरभरा, सूर्यफूल, करडई आदींसह विविध रब्बी पिकांची पेरणी केली. मात्र ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर महावितरण कंपनीने अघोषित लोडशेडींग सुरु करून शेतकऱ्यांना हैराण करून सोडले आहे. महावितरण कंपनीचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता भडंगे, लाईनमन पुरी यांच्या मनमानी कारभारामुळं रब्बी हंगामात शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
शेतकऱ्यांना केवळ सहा तास वीज पुरवठा केला जात असून, त्यातही तीन तीन तास खंडित होत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांची पिके नुकसानीत येण्याची शक्यता वाढली आहे. रब्बी हंगामासाठी सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना पुन्हा नुकसानीचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी नागरिकांनी दिनांक ११ नोव्हेंबर रोजी थेट महावितरण कार्यालय गाठून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितल्या प्रमाणे शेतकऱ्यांना २४ तास सुरळीत वीज पुरवठा द्या अशी मागणी केली आहे. यावेळी उडवा उडावीची उत्तरे देणाऱ्या लाइनमन पुरी यांना संतप्त नागरिकांनी घेराव घालत शेती पंपाला सुरळीत वीज पुरवठा देण्यास टाळाटाळ का..? केली जाते. शेतकऱ्यांना केवळ पैश्यासाठी वेठीस धरल्या जाते अश्या प्रकारे खरी खोटी सूनावत उपस्थित झालेल्या शेतकरी बांधवानी महावितरण कर्मचाऱ्याला जाब विचारला आहे.
एव्हडेच नाहीतर महावितरण कंपनीचा प्रभारी कारभार चालविणाऱ्या अभियंता भडंगे व लाइनमन पुरी हे शेतकऱ्यांचे फोन उचलत नाहीत. पैसे दिल्याशिवाय महावितरण कार्यालयाचे अधिकारी लाइनमन काम करत नाहीत. इथे प्रॉब्लेम झाला…. तिथे प्रॉब्लेम झाला…. असे सांगून शेतकऱ्यांना परेशान करून सोडतात. आत्तापर्यंत अनेकदा वर्गणी गोळा करून आम्ही पैसे दिले मात्र वीजपुरवठा सुरळीत केला जात नाही. यामुळे रात्रीला जीव धोक्यात घालावा लागत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयात पत्रकारांशी बोलताना केला आहे.
अश्या प्रकारे शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या अभियंता व लाईनमनची तात्काळ बदली करून शेतकऱ्यांना रब्बीसाठी सुरळीत वीजपुरवठा द्यावा. नाहीतर आम्ही आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करणार नाही असा पवित्रा ग्रामस्थ शेतकऱ्यांनी घेतला आहे. यावेळी सरपंच गुलाबराव राठोड, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मारोतराव बोथीगे, पंडित रघुजीवार, दामोधर काळे, पोलीस पाटील विलास डवरे, उपसरपंच धर्तरीनाथ डवरे, मारोतराव खूपसे, अर्जुन जाधव, तिरुपती खरोडे, आनंद मोरे, बालाजी खोकले, नितीन जाधव, भोराजी वागतकर, बळवंत डवरे, बालाजी वानोळे, कोंडबाराव मोरे, नामदेव मोरे, दादाराव डवरे, हरिदास डवरे, उत्तम खरोडे, नागराज खरोडे, नितीन डवरे, जयवंत डवरे, यांच्यासह वाशी, एकघरी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सांगतात की शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा देण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र महावितरण मधील अधिकारी अघोषित व मनमानी पद्धतीने लोडशेडिंग घेऊन वारंवार वीजपुरवठा खंडित करत शेतकऱ्यांना सुलतानी वागणूक देत आहेत. शेतकरी महावितरण कार्यालयावर आले कि केवळ दिशाभूल करणारी माहिती देऊन शासनाला चुना लावता वीज चोरांना मात्र अभय देत आहेत. तर नियमाने वीजपंपाचे बिल भरून देखील शेतकऱ्यांना वेठीस धरून सावत्रपणाची वागणूक देत असल्याचा आरोप महावितरण कार्यालयावर धडक दिलेल्या वाशी, एकघरी, परिसरातील शेतकरी, नागरिकांनी केला. आणि शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत देण्यात मनमानी कारभार करणाऱ्या लाइनमन, अभियंता यांची उचलबांगडी करावी अशी मागणी केली आहे.