उमरखेड, अरविंद ओझलवार| महाराष्ट्रातील राजकारणाचा प्रभाव संपुर्ण देशावर असुन येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होणार असुन महाराष्ट्रात सत्ता परीवर्तन होताच केंद्रातील नायडू व नितीशकुमारांच्या कुबडयावर असलेले सरकार पडणार असल्याची भविष्यवाणी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली .
ते उमरखेड येथील कॉग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांच्या प्रचारार्थ आयोजीत जाहीर सभेत बोलत होते. यावेळी मंचावर खासदार नागेश पाटील आष्टीकर , वजाहत मिर्झा , संदेश चव्हाण, प्रफुल मानकर , तातु देशमुख , राम देवसरकर , बाळूपाटील चंद्रे, राजुभैय्या जयस्वाल, बळीराम मुटकुळे , नंदकिशोर अग्रवाल सह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी भाजपच्या भ्रष्टाचार प्रवृत्तीवर घनाघात केला मालवणच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणे म्हणजे भ्रष्टाचाराची परिस्थिती घातल्याचे ते म्हणाले महाराष्ट्रातील उद्योगधंदे बंद पाडून तसेच आलेले उद्योगधंदे गुजरातला पळविण्याचे पाप महायुती सरकारने केल्याचे ते म्हणाले .
यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन जुम्लेबाज मोदी विसरले असून शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला .महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर समृद्धी महामार्गाच्या कामाची श्वेतपत्रिका तयार करणार असल्याचे ते म्हणाले .महायुतीने शेतकऱ्यांना बरबाद करण्याचे ठरवले असून शेतीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंचे भाव वाढवले परंतु शेतमालाला भाव वाढवला नाही शेतकऱ्यांच्या घामाला दाम न देता जिवंत मारण्याचे धोरण भाजपाचे असल्याचे सांगत केंद्रात भाजपाचे मनुस्मृतीचे सरकार आल्यावर डॉक्टर बाबासाहेबांच्या आर्थिक धोरण बदलण्यात आले व जनतेचे पैसे लुटून उद्योगपतींचे घर भरण्याचे धोरण भाजपने अंगीकारले असून जनतेला गरीब करून गुलाम बनवण्याचे षडयंत्र भाजप सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला .
आचारसंहिता संपल्यानंतर राज्यातील पंधरा हजार जिल्हा परिषद शाळा बंद करणार असून शिक्षण बंद करून जनतेला आर्थिक कमजोर करून भाजपाला जनतेला गुलाम बनवायचे आहे असा आरोप त्यांनी केला .महायुतीच्या लोकांना आपण विधानसभा हरणार असल्याचे स्पष्ट दिसत असल्याने ते शेतकरी बेरोजगार महागाई बद्दल न बोलता हिंदू मुस्लिम हिंदू बौद्ध हे विषय काढून द्वेष पसरत असल्याचे सांगत पंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांचा घामाचा वास सहन होत नाही मोदींनी कोरोना भारतात आणला वैद्यकीय सुविधेपेक्षा अंधश्रद्धेवर भर दिला .कोरोना काळात दिलेल्या लसीमुळे अनेकांना शारीरिक व्याधी होऊन मृत्यू होत आहे परंतु कारवाई मात्र लस बनवणाऱ्या कंपनीवर करण्यात येते ही शोकांतिका असल्याचे ते म्हणाले . “बटोंगे तो कटोंगे ” या वाक्यावर त्यांनी पंतप्रधान मोदी हे दहा वर्षात देशाच्या एकात्मतेसाठी कमी पडल्याचे सांगत काँग्रेसच्या इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी शहीद झाल्याचे सांगत सर्व जाती-जातीत देश पसरवणाऱ्या भाजप सरकारला पाडण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केली. सभेचे सूत्रसंचालन राम देवसरकर यांनी केले.
प्रधानमंत्री विकत घेऊ शकले नाही तर….
उमरखेड विधानसभेतील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार माजी आमदार विजयराव खडसे अपक्ष निवडणूक लढवीत आहेत .काँग्रेसच्या तिकीट साठी ते आग्रही होते परंतु त्यांना तिकीट न देता साहेबराव कांबळे यांना तिकीट मिळाल्यानंतर विजयराव खडसे यांनी नाना पटोले यांनी पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप केला होता .त्यावर उत्तर देताना नाना पटोले यांनी मला पंतप्रधान विकत घेऊ शकला नाही एवढे वाक्य बोलून त्याच्याविषयी जास्त बोलणे नको असे म्हणत भाषणाचा रूख बदलला .