हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिह्यातील हदगाव हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या पिंपळगाव येथे भव्य सत्संग सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, गुरुवारपासून धार्मिक कार्यक्रमांला सुरुवात होणार आहे. या कथेला सर्वानी उपस्थित व्हाव असे आवाहन माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी नांदेड न्यूज लाइव्हच्या माध्यमातून केलं आहे.


दिनांक ६ मार्चपासून सुरु होणाऱ्या कथा सोहळ्यात सकाळी ७ ते १० या वेळेत विश्वशांती दत्तयाग १०८ कुंडी महायज्ञ होणार असून, दररोज ४३७ दाम्पत्य यज्ञासाठी सात दिवस बसणार आहेत. सकाळी नऊ वाजता श्री दत्त मंदिर तीर्थक्षेत्र पिंपळगाव येथून हत्ती, उंट, घोडे, ढोलताशे, बँड पथक, भजन, कलश आदिसह भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यांनतर दुपारी १२ वाजता भव्य शिवमहापुराण कथेला सुरुवात होणार आहे. कथा मंचावरून श्रीश्रीश्री १००८ अनंत श्रीविभुषित स्वामी राजेंद्रदास महाराज शिवमहापुराण कथा सांगणार आहेत. तर रात्रीला नामसंकीर्तन भजनसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सत्संग कार्यक्रमाची तयारी गेल्या एक वर्षांपासून सुरु करण्यात आली असून, तो क्षण जवळ येऊन ठेपला आहे. हदगाव हिमायतनगर तालुक्याच्या पावन भूमीत हा सत्संग कार्यक्रम होत असल्याने तालुक्यातील जनेतेसह विविध जिल्ह्यातून भाविक भक्त लाखोंच्या संख्येत येणार आहेत. विविध राज्यातून येणाऱ्या साधू संतांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी सर्वानी कथेला उपस्थित व्हाव असे आवाहन माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी नांदेड न्यूज लाइव्हच्या माध्यमातून केले आहे. यावेळी श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांच्यासह हाफगाव हिमायतनगर तालुक्यातील मोट्या प्रमाणात भाविक भक्त व स्वयंसेवक उपस्थित होते.
