हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर ते पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली या अंतर्गत रस्त्याचे काम प्रधानमंत्री सडक योजनेतून गेल्या साढेतिन वर्षांपासून अतिशय कासव गतीने करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका ठेकेदाराकडून हे काम केवळ म्हणायलाच सुरू आहे. मात्र या रस्ता कामाला कुठलीच गती मिळत नसल्याने काम अजूनही थांबूनच आहे. रस्त्यावर गिट्टी व मुरूम अंतरून निवडणुकीपूर्वी ठेकेदाराने काम बंद केले आहे. त्यामुळे आजघडीला रस्त्यावरील गिट्टी उखडून मोकळी झाली असल्याने प्रवाश्यांची मोठ्याप्रमाणात हेळसांड होत आहे. या अंतर्गत रस्त्याचे काम दर्जात्मक पद्धतीने पुर्ण करूण प्रवाश्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी हिमायतनगर, पळपसुर, डोल्हारी, ढाणकी भागातील नागरिक, शेतकरी व वाहनधारकातून केली आहे.
हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली या अंतर्गत रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असल्याने तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड – यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या हिमायतनगर तालुक्यातील एकंबा – सिरपल्ली – डोल्हारी – पळसपूर – हिमायतनगर – पार्डी – एकघरी या रस्त्यासाठी ७३० लक्ष रुपयांच्या निधी उपलब्ध करून दिला होता. मोठ्या थाटात रस्ता कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांना आनंद झाला होता. मात्र ठेकेदाराने आपल्या स्वार्थासाठी रस्त्याचे काम अतिशय कासव गतीने चालविले आहे. छत्रपती संभाजी नगर येथील सिद्दीकी नामक ठेकेदाराने या रस्त्याच्या कामाचे बारा वाजविले असून,कामाचा अवधी संपुष्टात येवून ही काम पुर्णत्वास गेले नाही. या विभागाचे शाखा अभियंता उप अभियंता व तसेच कार्यकारी अभियंत्याला ठेकेदाराने मॅनेज करून सुधारीत मूल्यांकन करून निधी उचल केला असल्याचे विकासप्रेमी नागरिक बोलत आहेत.
नागरिकांनी रस्त्यासाठी आंदोलन केल्यानंतर ठेकेदाराने या रस्त्यावर केवळ गिट्टी अंथरून त्यात मातीमिश्रित मुरूम टाकुण पुन्हा काम बंद केले. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर प्रचंड चिखल निर्माण होऊन अनेकांची घसरगुंडी झाली होती. पावसाळा संपल्यानंतर आता रस्त्यावरील गिट्टी मोकळी झाल्याने दुचाक्या स्लिप होऊन प्रवाशी नागरिकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. तसेच अनेकांना या गिट्टीच्या रस्त्याने प्रवास केल्याने पाठीचा, मणक्याच्या आजाराचा सामना करावं लागतो आहे. या रस्त्यावर अपघात होऊन एखाद्याचा जीव गेल्याशिवाय रस्त्याचे काम पूर्ण होणार नाही का..? असा संतापजनक सवाल नागरिक विचारीत आहेत.
हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली या अंतर्गत रस्त्याची झालेली दयनीय अवस्था लक्षात घेता, अर्धवट काम ठेवणाऱ्या गुत्तेदाराचे व एजन्सीचे नाव काळ्या यादीत टाकून कारवाई दंडात्मक कार्यवाही करावी आणि या रस्ता कामाची पुनर्रनिविदा काढण्यात येऊन अन्य ठेकेदारामार्फत तात्काळ रस्ता पुर्ण करूण देऊन प्रवाशी नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.